

बामणोली : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सावरी ड्रग्ज प्रकरणातील गुंता कायम असून बामणोली परिसरात शुक्रवारी स्थानिकांमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटले. या प्रकरणात सहभाग नसल्याची मुंबई पोलिसांनी पोचपावती दिल्यावर ओंकार डिगे रविवारपासून अद्यापही नॉट रिचेबल आहे.
पावशेवाडीतील त्याचा वावर बंद असून या परिसरात तो कुणालाही दृष्टीस पडलेला नाही. त्याचे दोन्हीही फोन नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्याला नॉट रिचेबल का व्हावे लागत आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
सावरी, ता. जावली गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरीत तब्बल 115 कोटींचे घबाड सापडल्यानंतर या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचे नाव या प्रकरणात विराधकांकडून घेण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रश्नी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगावे लागले. तोवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांनाच थेट पत्र पाठवून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरून बाजुला करावे, अशी मागणी केली. एकीकडे राजकीय पातळीवर हे घमासान सुरू असताना दुसरीकडे बामणोली परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका प्रेसनोटद्वारे ओंकार तुकाराम डिगे (वय 30) याची चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला नसल्याचे सांगून टाकले होते. मात्र, स्थानिकांनी त्यावरून रान उठवले आहे. ओंकार डिगे याचा सहभाग नाही तर त्याचे दोन्हीही फोन लागत का नाहीत? या परिसरात दररोज दिसणारा डिगे रविवारपासून कुठे गेला आहे?, त्याला कशाची भिती वाटत आहे? असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
ज्याने मेफेड्रोन ड्रग्ज मुंबईतील संशयितांना दिले तो पुण्याचा विशाल मोरे हाही स्थानिकांच्या चर्चेच्या रडारवर आला आहे. विशाल मोरेने सावरीतून ड्रग्ज खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मग विशाल मोरेचा स्थानिक मध्यस्थ कोण आहे? पोलिसांनी त्याचा छडा लावला का? कुणाच्या सहकार्याने विशाल मोरेचे नेटवर्क सावरीपर्यंत पोहोचले? याचाही शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी अवघ्या कोयना खोऱ्यातून होवू लागली आहे.