

कोल्हापूर : डिसेंबर 2022 ला जन्माला आलेली अनधिकृत कुस्ती संघटना जिल्ह्यातील पैलवानांना जिल्हा चाचणी निवड स्पर्धेत बंदी घालून पैलवानांचे नुकसान करत आहे, असा कोणताही अधिकार अनधिकृत संघटनेला नाही. या पुढे कोणत्याही संस्थेने पैलवानांवर बंदी घालू नये. याबाबतीत जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे करण्यात आली आहे.
सन 1960 साली स्थापन झालेली कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ व 1972 साली स्थापना झालेली कोल्हापूर शहर राष्ट्रीय तालीम संघ या मूळच्या अधिकृत कुस्ती संघटना आहेत. या कुस्ती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने गेल्या वर्षी कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली होती व याही वर्षी स्पर्धेचे नियोजन केले आहे. या स्पर्धेला 73 वर्षांचा इतिहास आहे.
पैलवानांनी कोणत्या स्पर्धेत खेळावे किंवा खेळू नये हा प्रकार म्हणजे कुस्ती क्षेत्राचे नुकसान आहे. कुस्ती खेळाला राजकीय रंग नको. शाहू सहकारी साखर कारखाना कुस्तीला प्रोत्साहन म्हणून गेले अनेक वर्षे स्पर्धा घेत आहे. यंदा स्पर्धेचे नियोजन अनधिकृत कुस्ती संस्थेकडे न दिल्याने राजकीय सुडापोटी कारखान्याच्या मानधनधारक मल्लांना निवड चाचणीत सहभागी होऊ दिले नाही. यामुळे पैलवानांचे नुकसान झाले आहे. निवड चाचणीत पैलवानांना बंदी घातली मग पंच कसे चालले? त्यांच्यावर बंदी का नाही ? अनधिकृत कुस्ती संस्थेची प्रवेश फी नियमात आहे काय? असे सवालही व्यक्त करण्यात आले आहेत.