हिंगोली : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा | पुढारी

हिंगोली : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा; आखाडा बाळापूर येथे रिक्षा चालकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ॲटो चालकासह त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.

आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत येथील एक मुलगी शिक्षणासाठी दररोज ये-जा करते. दरम्यान, रिक्षाचालक रिजवान खाँ याने तिच्यावर वाईट नजर ठेवण्यास सुरवात केली. तो वेळोवेळी तिला बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सदर मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली होती.

दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालकाने त्याच्या समीर खाँ नावाच्या मित्राला त्या मुलीस चिठ्ठी देण्यास सांगितले. त्यावरून समीर याने मुलीला चिठ्ठी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार तिचा भाऊ व कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आज सायंकाळी थेट आखाडा बाळापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

यावरून पोलिसांनी रिक्षा चालक रिजवान व त्याचा मित्र समीर याच्यावर गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद यांच्या पथकाने कुपटी शिवारातून दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button