हनुमान जन्मभूमी नसलेल्या पुराव्यांचा निरर्थक वितंडवाद | पुढारी

हनुमान जन्मभूमी नसलेल्या पुराव्यांचा निरर्थक वितंडवाद

नाशिक : श्याम उगले

संकटमोचक हनुमान हा तसा सर्वांचाच आवडता देव आहे. खरे तर रामायणामध्ये हनुमान भेटतो तो एक भक्त म्हणून. त्याला रुद्राचा अवतार म्हणून भारतीय पुराणांनी आणि ‘रामायण’, ‘महाभारत’ या महाकाव्यांनी मान्यता दिलेली आहे. तसेच तो सप्तचिरंजीवींपैकी एक असल्यामुळे प्रत्येक युगात त्याचे दर्शन घडते, अशी मान्यता आहे. यामुळेच महाभारत युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर बसलेल्या हनुमानाचे तेथे असणे कोणालाही खटकत नाही. पुराणांच्याच भाषेत बोलायचे झाले, तर आजच्या कलियुगातही हनुमानाच्या दर्शनानंतरच संत तुलसीदास यांनी ‘रामचरित मानस’ ही अद्वितीय काव्यकृती लिखाणास घेतली. जेथे कोठे रामकथा चालू असेल, तेथे हनुमान उपस्थित असतात, असे तुलसीदासांनी ठामपणे सांगून ठेवले आहे. त्यामुळे हनुमानाच्या भक्तांचाही या वचनांवर दृढ विश्वास आहे.

अलीकडच्या काळात महाराष्ट्रीयनांमध्ये ‘नर्मदा परिक्रमा’ करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातील अनेकांनी त्यांच्या परिक्रमेच्या आठवणी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत. त्यामध्ये नर्मदाजीच्या किनार्‍यावर सप्तचिरंजीव भ्रमण करीत असतात व त्यातील काहींनी या सप्तचिरंजीवांचे व त्यातही हनुमानाचे दर्शन घडल्याचेही नमूद करून ठेवले आहे. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे हनुमानाचा जन्म नेमका कोठे झाला याबाबतच्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातील वादानंतर त्याची रणभूमी महाराष्ट्र बनू पाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील शास्त्रार्थातील मुद्द्यावरून गुद्यांवर आलेली चर्चा. केवळ पुराणे व महाकाव्यांमधील उल्लेखांच्या आधारावर झालेली चर्चा म्हणजे नसलेल्या पुराव्यांचा निरर्थक वितंडवाद ठरला आहे. आधीच गेले महिनाभरापासून भोंगे आणि हनुमान चालीसा वादावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना आता अचानक कर्नाटक राज्यातील हम्पी येथील एक दंडी साधू त्र्यंबकेश्वर येथे येऊन त्र्यंबकेश्वर, अंजनेरी व नाशिक येथील लोकांना आव्हान देतात की, हनुमानाचे जन्मस्थळ हे त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी पर्वत नसून हनुमानाचे जन्मस्थळ हे किष्किंधा (सध्याचे हम्पी) येथील अंजनाद्री पर्वत आहे. कोणी एखाद्या व्यक्तीने येऊन असे विधान केले असते व ते बोलून ते निघून गेले असते, तर नाशिकमधील लोकांनीही हे बोलणे फारसे गांभीर्याने घेतले नसते.

मात्र, नुकतेच तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानच्या विरोधात हनुमान जन्मस्थळाबाबत मोठी लढाई जिंकून एक देव, एक जन्मस्थळ व एक जन्मतिथी हा लढा घेऊन दिग्विजयाला निघालेले दंडीस्वामी गोविंदानंद सरस्वती नाशिकमध्ये येऊन तळ ठोकतात व येथील लोकांना त्र्यंबकेश्वरजवळील ‘अंजनेरी’ हे हनुमानाचे जन्मस्थान नसून ‘किष्किंधा’ येथील गुहांमध्ये हनुमानाचा त्रेतायुगात जन्म झाल्याचे निक्षून सांगतात. तसेच याबाबत कोणाही सोबत शास्त्रार्थ करण्याची तयारी असल्याचे आव्हान देतात. यामुळे वर्षानुवर्षे अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याची श्रद्धा असलेल्या नाशिककरांच्या श्रद्धेला धक्का लागणे स्वाभाविक आहे. त्यानुसार अंजनेरी पर्वताच्या आजूबाजूला असलेल्या आश्रमांमधील साधू-संत, त्र्यंबकेश्वर येथील विद्वान, संत-महंत, नाशिकमधील अभ्यासक, संत-महंत यांनी गोविंदानंद सरस्वतींचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोविंदानंद यांना भलताच आत्मविश्वास असल्याने त्यांनी त्र्यंबकेश्वर येथून नाशिकला येताना हनुमान रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंजनेरी येथील स्थानिकांनी या रथयात्रेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. गोविंदानंद यांना एवढे गांभीर्याने घेण्याची गरज काय आहे? सरकारने कोठे अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाच्या दाव्याविरोधात भूमिका घेतली आहे, अशा शब्दात नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणात नाशिककरांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले. जन्मस्थळाच्या वादापेक्षा रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचीही आठवण त्यांनी करून दिली. मात्र, नाशिक जिल्ह्यातील लोकांच्या श्रद्धास्थानाला हा धक्का असल्याची चर्चा तर होणारच, अशी भूमिका जन्मस्थळाशी व धर्मशास्त्राशी संबंधित मंडळींनी घेतली. चर्चा शांततेने करण्यापेक्षा त्यात अधिकाधिक नाट्यमयता आणण्याचे दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न झाले. त्यामुळे हनुमानाचे जन्मस्थळ नेमके कोणते मानायचे, या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा एकमेकांचे उणेदुणे काढणे व एकमेकांवर धावून जाणे यालाच शास्त्रार्थ आणि धर्मसभा म्हणतात ही बाब लोकांच्या मनावर बिंबवण्याचे काम अधिक झाले.

एक हनुमान, अनेक जन्मस्थळे
हनुमान हा चिरंजीव आहे व तो आजही आपल्याला दर्शन देतो, अशी श्रद्धा असणारे असंख्य लोक नित्यनेमाने हनुमानाची पूजा करतात. हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्राचे पठण करतात. त्यांच्यासाठी हनुमानाचा जन्म कोठे झाला या मुद्द्याला फार महत्त्व नाही. मात्र, तीर्थस्थळ म्हणजे पर्यटन व पर्यटक आले म्हणजे देवस्थानला अधिक पैसा हा नवीन मंत्र झालेला आहे. भारतात तिरुपती, शिर्डी आदी अनेक तीर्थस्थळांच्या उत्पन्नाचे आकडे नेहमीच आपल्या कानावर आदळत असतात. अशाच स्पर्धेतून हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद उभा करण्यात आला असून, तो वाद महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत ओढून आणला आहे. हा वाद केवळ येथेच थांबणार नसून देशात हनुमानाचा जन्म या ठिकाणीच झाला, अशी सात-आठ तरी ठिकाणे आहेत व त्या प्रत्येक ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला, यावर त्यांची अखंड श्रद्धा आहे. मात्र, तिरुमला तिरुपती देवस्थानने तिरुमला येथून जवळच असलेल्या अंजनाचलम हेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे, असे जाहीर करण्यातून या वादाचा जन्म झाला आहे. या देवस्थानने देशभरातील विद्वान व शास्त्रज्ञांची एक समिती स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पुराण व धर्मग्रंथांमधील उल्लेखांवरून ‘अंजनाचलम’ हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे जाहीर करून टाकले. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या या नव्या प्रयोगाला हम्पी येथील तीर्थक्षेत्र ट्रस्टचे दंडीस्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी विरोध केला. हम्पी हे ठिकाण यापूर्वीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असून, तेथील पर्वतावरील गुंफा म्हणजेच सुग्रीवाची किष्किंधा नगरी अशी मान्यता आहे. आंध्र प्रदेशाप्रमाणेच कर्नाटकमधील शिवमोंगा जिल्ह्यातील ‘गोकर्ण’ हे हनुमानाचे जन्मस्थळ असून, श्रीलंकेतील अशोकवनात हनुमानाने स्वतःची ओळख करून देताना हनुमानाने गोकर्ण येथे जन्म झाल्याचे नमूद केल्याचा दावा राघवेश्वर भारती यांनी केला. या लढाईमध्ये बाजी मारून एक देव, एक जन्मस्थळ आणि एक तिथी या मोहिमेवर निघालेले गोविंदानंद सरस्वती नाशिकमध्ये धडकले असले तरी भारतात हनुमानाची आणखीही जन्मस्थळे आहेत. गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील ‘अंजनी गुंफा’ या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याची मान्यता आहे. याबरोबरच झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील ‘आंजन’ नावाने गाव तेथील गुंफेत हनुमानाचा जन्म झाला, अशी त्या राज्यातील भाविकांची श्रद्धा आहे. त्या गुंफेमध्ये हनुमानाची प्राचीन मूर्ती आहे. यापलीकडेही अद्याप उजेडात न आलेली अनेक स्थळे ही हनुमानाची जन्मस्थळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंडोनेशियातील ‘बाली’ येथे पंचवटी, जटायू-श्रीराम भेटीचे ठिकाण म्हणून भारतातून जाणार्‍या पर्यटकांना दाखवले जाते. तसेच हनुमानाचेही जन्मठिकाण असू शकेल. त्यामुळे गोविंदानंदांचा हट्ट हा बालहट्ट होण्याचाच धोका अधिक आहे.

दोन जन्मतिथी – हनुमानाचा जन्म नेमका कोणत्या तिथीला झाला, याबाबतही दोन मते आहेत. उत्तर भारतीयांच्या मते हनुमानाचा जन्म कार्तिक कृष्ण चतुर्दशी (आपल्याकडे दिवाळीच्या आदला दिवस) या दिवशी झाल्याची मान्यता आहे, तर दक्षिण भारतात हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाल्याची मान्यता आहे.

व्यवहार्य तोडगा – हनुमानाचा जन्म त्रेतायुगात झाला, हनुमानाच्या आईचे नाव अंजनी माता होते. हनुमान वायुपुत्र आहे. याबाबत सर्वांचे एकमत आहेे. त्यानुसार हनुमानाच्या प्रत्येक जन्मस्थळाच्या ठिकाणी अंजनीच्या नावाने पर्वत, किष्किंधानगरी, पंपासरोवर या खुणाही दाखवल्या जातात. फक्त वाद आहे, तो मी म्हणतो तेेच खरे या गोष्टीवरून. त्यामुळेच रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य आचार्य गंगाधरशास्त्री पाठक यांनी नाशिक येथे हनुमान जन्मस्थळाबाबत झालेल्या शास्त्रार्थावर दिलेला निर्णय व्यवहार्य वाटतो. त्यांनी हिंदू कालगणना सविस्तरपणे सांगून आतापर्यंत चतुर्युगांची 28 आवर्तने झाली आहेत. त्यानुसार त्रेतायुगात आतापर्यंत 28 वेळा हनुमानाचा जन्म झाला असून, ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या तिथींना जन्मले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा निकाल दिला आहे. यामुळे हनुमान जन्मस्थळ म्हणून लोकमान्यता असलेले प्रत्येक ठिकाण हे हनुमान जन्मस्थळ म्हणून मानले जावे व दंडीस्वामी गोविंदानंद सरस्वती यांनीही ती भूमिका मान्य करावी, असे त्यांनी बजावले आहे. गंगाधर पाठक यांच्या निर्णयानंतर आता दंडीस्वामी त्यांचा हट्ट कायम ठेवतात की, माघार घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा:

Back to top button