रेल्वेत डल्ला मारणार्‍या ‘साहसी गँग’च्या दोघांना अटक; तिरूचिरापल्ली-अहमदाबाद एक्सप्रेसमधील घटना | पुढारी

रेल्वेत डल्ला मारणार्‍या ‘साहसी गँग’च्या दोघांना अटक; तिरूचिरापल्ली-अहमदाबाद एक्सप्रेसमधील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेमधून प्रवास करणार्‍या प्रवाशाच्या सामानातील 47 ग्रॅम सोन्यासह रोख रक्कम चोरणार्‍या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतून पळून जाताना पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्डात मोठ्या शिताफीने पक़डले. हे दोघे तिरूचिरापल्ली-अहमदाबाद एक्सप्रेसमधून उतरून रिक्षाने पळून जाण्याच्या तयारीत होते.

रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सामानाच्या आणि त्यातील मौल्यवान वस्तू, मोबाईल चोरीच्या घटना अलीकडील काळात वाढत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून प्रवाशांना प्रवास करताना मौल्यवान वस्तु जवळ न बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही अडचणींमुळे प्रवाशांना मौल्यवान वस्तु सोबत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी, रेल्वे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित बनला आहे. तरी सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा, आरपीएफ निरीक्षक सुधीरकुमार मिश्रा, सुनील कुमार यादव, उप निरीक्षक मुकेश कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली जवान संतोष गायकवाड, गोविंद पर्गे, बाप्पू सोनावणे, विशाल माने, युवराज गायकवाड, सय्यद रसूल हे पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांमध्ये गस्तीवर होते.

इतक्यात स्थानकावर तिरूचिरापल्ली-अहमदाबाद एक्सप्रेस (विशेष) आली. त्या गाडीतून उतरून दोघेजण पळताना आरपीएफ जवानांना दिसले. हे दोघेजन यार्डातून निघून रिक्षा पकडत असताना त्यांना पकडले. आणि पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी केलेल्या अधिक तपासादरम्यान त्यांच्याकडून एकूण 4 लाख 57 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 47 ग्रॅम सोने आणि 28 हजार रूपये रोख रक्कम आढळली. संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही लोहमार्ग पोलिसांकडून केली जात आहे.

ही आहेत आरोपींची नावे

याबाबत आरपीएफ अधिकारी म्हणाले, अटक केलेले दोघेजण प्रसिध्द साहसी गँगचे आहेत. नवीन कुमार फुलचंद साहसी (वय 31, औरंगनगर, हरयाणा) आणि किशोर जयसिंग मित्तल (वय 48, मोखरा, हरयाणा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला असून, पुढील कार्यवाहीसाठी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अशा अनुचित घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवास करताना बॅगाची काळजी घ्यावी, तसेच, प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तु सोबत बाळगणे टाळावे.

हेही वाचा : 

Back to top button