सातारा : जिल्ह्यातील वृक्षारोपणाला कोरोना संसर्ग | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील वृक्षारोपणाला कोरोना संसर्ग

सातारा : महेंद्र खंदारे
भाजप सरकारच्या काळात राज्यात 33 कोटी वृक्षारोपण झाले. मात्र, त्यानंतर कोरोना काळात जिल्ह्यात त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. कोरोना काळात जिल्ह्यात केवळ 20 साईटस्वरील 165 हेक्टरवर वृक्षारोपण झाले आहे. कोरोनामध्ये सर्व विभागांचा निधी आरोग्यकडे वळवल्याने वृक्षारोपणासाठी निधीच न आल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे दोन वर्षात वृक्षारोपणलाचा कोरोनाचा संसर्ग झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगात ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानवाढ होत असताना मोठया प्रमाणात वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. वृक्षच मातीची धूप व आणि तापमानवाढ रोखतात. याचा परिणाम अतिवृष्टी व इतर आपत्ती रोखण्यातही होतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होत आहे. परंतु, गत दोन वर्षात राज्यस्तरावरील पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी ठोस असे प्रयत्न झालेले नाहीत. झाडे पर्यावरणचा अविभाज्य घटक आहेत. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी 33 टक्के क्षेत्र वनाच्छिदत असावे, असे पर्यावरण तज्ञ सांगतात. परंतु, राज्य व सातारा जिल्ह्यात साधारण 20 ते 22 टक्के इतकेच वनाच्छदित क्षेत्र आहेत.

गत दोन वर्षात सातारा जिल्हा वन विभागाला निधी मिळवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. सरकारकडून व जिल्हा नियोजन समितीमधूनही निधी मिळत नसल्याने आस्थापना खर्च भागवतानाही नाकी नऊ आले. मजूरांचे वेतन, कार्यालयीन खर्च भागवण्यासाठी पैसे नसताना वृक्षारोपणाला ही कोलदांडा देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच मंडलात वृक्षारोपणाला ब्रेक लागला. दोन वर्षाच्या कालावधीत निधी अभावी केवळ 165 हेक्टरवर वृक्षारोपण झाले. या वृक्षारोपणात बहुतांश मंडलांमध्ये हेक्टरी 1600 झाडे लावण्याचा पॅटर्न राबवला. जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्षारोपण हे वाई व खटाव तालुक्यात झाल्याचे दिसून येते. तर खंडाळा, जावली व महाबळेश्वर तालुक्यात वृक्षारोपणच झाले नाही.

जिल्ह्यातील एकूण 20 साईटस्वर हे वृक्षारोपण झाले. हे वृक्षारोपण झाल्यानंतर यावर जो खर्च झाला याचाही काही निधी अजून मिळालेला नाही. त्यामुळे दोन वर्षात लावलेल्या झाडांसोबत 33 कोटी वृक्षारोपणात जिल्ह्यात तब्बल 1 कोटी झाडांची लागवड करण्यात आली होती. या झाडांचे संगोपन करताना अधिकार्‍यांना निधीची कमतरता भासू लागली. यातूनच वन मजूरांचे तब्बल 10 महिने वेतन रखडले होते. हे वेतन आता देण्यात आले असले तरी झाडाच्या संगोपनाचा खर्च करताना अनेक अ‍ॅडजेस्टमेंट कराव्या लागत आहेत.एप्रिल 2022 पासून नवीन वर्ष सुरू झाले असून वन विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. परंतु, यंदाही वृक्षारोपण हे कमीच होण्याची शक्यता जास्त आहे.

जिल्ह्यात सुमारे तीन लाख झाडांची लागवड

शासनाच्या नियमानुसार जागा व मुबलक पाणी याच्या आधारावर हेक्टरी झाडे लावली जातात. यामध्ये हेक्टरी 625, 1100, 1600 आणि 2500 अशी झाडे लावली जातात. कोरोना काळात जिल्ह्याच्या बहुतांश भागात हेक्टरी 1600 झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे या कालावधीत सुमारे 3 लाख झाडांची लागवड करण्यात आली आहे. दुष्काळी भागात वृक्षारोपणाचे प्रमाण अधिक आहे.

जिल्ह्यातील वृक्षारोपण

तालुका                        हेक्टर
सातारा                      5 हेक्टर
कराड                      10 हेक्टर
पाटण                       20 हेक्टर
वाई                          30 हेक्टर
फलटण                    25 हेक्टर
माण                         20 हेक्टर
खटाव                       35 हेक्टर
कोरेगाव                    20 हेक्टर
महाबळेश्वर                 निरंक
खंडाळा                      निरंक
जावली                       निरंक

Back to top button