नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आलेल्या नाशिक-दिल्ली थेट विमानसेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी तब्बल २९५ प्रवाशांनी उड्डाण घेत, नाशिक-दिल्ली विमानसेवेचे स्वागत केले. यावेळी इंडिगो कंपनीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बऱ्याच काळानंतर नाशिक-दिल्ली थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने, नाशिकच्या विकासाला बळ मिळेल, अशी अपेक्षा उद्योग, पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे. (Nashik Delhi Flight)
'स्पाइस जेट' कंपनीने नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद केल्यानंतर नाशिकच्या राजधानी कनेक्टिव्हिटीला मोठी बाधा निर्माण झाली होती. ही सेवा सुरू केली जावी, अशी सातत्याने मागणी केली जात होती. याच दरम्यान, इंडिगो कंपनीने नाशिकच्या ओझर विमानतळावरून अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा आणि इंदूर या पाच शहरांसाठी सेवा सुरू केली आहे. याशिवाय हॉपिंग फ्लाइटने देशातील अन्य महत्त्वाच्या शहरांना जोडता येईल, अशी विमानसेवा उपलब्ध करून दिली. यामध्ये हॉपिंग फ्लाइटच्या माध्यमातून आठवड्यातून दोनदा नाशिक-दिल्ली विमानसेवा (Nashik Delhi Flight) सुरू होती. मात्र, ही सेवा थेट आणि नियमित असावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. दरम्यान, प्रवाशांची आग्रही मागणी लक्षात घेता, इंडिगो कंपनीने महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नाशिक-दिल्ली थेट विमानसेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे धार्मिक पर्यटन, उद्योगांसाठी कच्चा माल, केंद्रीय मंत्री, सचिव वा अन्य अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, व्यवसायवृद्धी, कॉर्पोरेट बैठका, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी मोठा लाभ होणार आहे.
दरम्यान, दिल्ली विमानसेवेची (Nashik Delhi Aviation) घोषणा केल्यापासून बुकिंग सेवा उपलब्ध करून दिली होती. या विमानसेवेसाठी कंपनीचे सीईओ साकेत चतुर्वेदी, व्यवस्थापक सुब्रता मोंडल, विमानतळाचे संचालक विलास आव्हाड, व्यवस्थापक नितीन सिंग, निमा एव्हीएशन कमिटीचे अध्यक्ष मनिष रावल यांनी विशेष प्रयत्न केले. विमानसेवेच्या प्रारंभाप्रसंगी हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
१८० सीटर प्लेन
वन थ्री २०- १८० प्रवशांची क्षमता असलेल्या विमानाने दिल्ली ते नाशिक १३६ अधिक दोन अशा एकुण १३८ प्रवाशांनी प्रवास केला. तर नाशिक ते दिल्ली १५६ अधिक एक अशा एकुण १५७ प्रवाशांनी प्रवास केला. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याने, कंपनीने समाधान व्यक्त केले. दरम्यान, सकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी दिल्ली येथून निघणारे विमान ८ वाजून ५० मिनिटांनी नाशिकमध्ये पोहोचले. तर सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी विमानाने नाशिकहून झेप घेत ११ वाजून १५ मिनिटांनी दिल्ली गाठली. (Nashik Delhi Aviation)
दोन्ही वैमानिक नाशिककर
वन थ्री-२० या १८० सीटर प्लेनचे दोन्ही वैमानिक नाशिककर आहेत. सिनियर कॅप्टन प्रवीण विजय गायकवाड आणि फर्स्ट ऑफिसर पंकज सुरेश दराडे अशी त्यांची नावे असून, आपल्या शहरासाठी विमानसेवा देताना आनंद होत असल्याचे दोघांनीही सांगितले आहे.
नाशिक-दिल्ली विमानसेवेमुळे नाशिकच्या पर्यटन, उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली विमानसेवेनंतर अन्य शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढल्यास नाशिकच्या विकासाला मोठा हातभार लागेल. – मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा.
हेही वाचा: