आयुष्यात ध्येय निश्चित करणे काळाची गरज : डॉ. कुलकर्णी | पुढारी

आयुष्यात ध्येय निश्चित करणे काळाची गरज : डॉ. कुलकर्णी

सातारा : पुढारी वृत्तसेवा
आयुष्यात ध्येय निश्चित असणे अत्यावश्यक आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे ध्येय रोज बदलते. यामुळे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

दै. ‘पुढारी’ आयोजित एज्यु दिशा 2022 व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत शिक्षण विषयक प्रदर्शनाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कुलकर्णी म्हणाले, योग्य क्षेत्र निवडणे म्हणजे आयुष्याला कलाटणी देण्यासारखे आहे. आजच्या जगात हुशार असणे महत्वाचे नव्हे तर त्याच्या अंगी कोणते गुण आहेत हे महत्वाचे आहेत.

शहाणपण, मनगटात ताकद, समज, बुद्धी आणि ध्येय समोर असले तर प्रत्येकजण यशस्वी होतो. विद्यार्थ्यांनी कोणी सांगितले म्हणून नव्हे तर आपले स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यातील ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. अ‍ॅटोमोबाईल, अ‍ॅटोमेशन व मॅकेट्रॉनिक यातील क्षेत्र निवडा. ध्येय साध्य करतानाची वाटचाल नेहमीच पॉझिटिव्ह असावी. आपल्या शेजारी बसणार्‍या विद्यार्थ्यांशी आपली स्पर्धा नसते तर ती वेळेशी असते. कारण दिलेल्या वेळेत प्रश्नांची अचूक उत्तरे देणे हे एक आव्हान असते, असेही कुलकर्णी म्हणाले. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. यातून पहिल्या चाळणी परीक्षेतच अनेक विद्यार्थ्यांची गळती होते. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी यातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास येते. करिअर घडवण्यासाठी या क्षेत्राकडे गांभीर्याने पहावे असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

 

 

Back to top button