राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ठाण्याच्या ७ प्रकल्पांची निवड | पुढारी

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ठाण्याच्या ७ प्रकल्पांची निवड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये ठाण्याच्या बाल वैज्ञानिकांचा डंका दिसून आला. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या ३० प्रकल्पांपैकी ७ प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील असून, यापैकी एका प्रकल्प व पालघर जिल्ह्यातील एका प्रकल्पाची सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांना जानेवारी महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या ‘१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेस’ या जेष्ठ वैज्ञानिकांच्या परिषदेत आपला प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या बाल वयात विज्ञानाची आवड जोपासली जावी, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा, या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रात ठाण्यातील ‘जिज्ञासा ट्रस्ट’ ही संस्था या परिषदेचे आयोजन व नियोजन करीत असते. यंदा या परिषदेचे ३० वे वर्ष असून, यंदाचा मुख्य विषय ‘आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे’ असा आहे.

यावर्षीची परिषद २७ ते ३० डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. या परिषदेची राज्यस्तरीय फेरी ३ व ४ डिसेंबर रोजी आभासी माध्यमातून पार पडली. त्यासाठी ३६ जिल्ह्यांतील ३ हजारांहून अधिक प्रकल्पांची नोंदणी जिल्हा पातळीवर झाली होती. त्यातील २६४ निवडक प्रकल्प राज्य स्तरावर सादर झाले. ४५ तज्ञ व्यक्तींनी या प्रकल्पांचे परीक्षण केले. व त्यातून ३० प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक ७ प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर मुंबईतील ४, पुण्यातील ४, पालघर येथील २, सिंधुदुर्ग २, कोल्हापूर २, सिंधुदुर्ग २, नंदुरबार २ व अमरावती, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, उस्मानाबाद, रायगड व सोलापूर येथील प्रत्येकी एका प्रकल्पाची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे.

ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकेंडरी शाळेच्या विराजित फुंडे आणि निविदा पगार यांचा इको फ्रेंडली मार्कर व पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या श्री. जयेश्वर विद्या मंदिर शाळेच्या प्रतिमा भोये आणि रोहित कोती या विद्यार्थ्यांच्या ‘नाचणी पिकाचा अन्नधान्य म्हणून अभ्यास’ या प्रकल्पाची सर्वोत्तम प्रकल्प म्हणून निवड झाली. या दोन्ही प्रकल्पातील विद्यार्थ्यांना जानेवारीमध्ये नागपूर येथे होणाऱ्या ‘१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेस’ या जेष्ठ वैज्ञानिकांच्या परिषदेत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत निवड झालेल्या बाल वैज्ञानिकांसाठी जिज्ञासा ट्रस्टतर्फे तज्ज्ञ व्यक्तींचे विशेष मार्गदर्शन शिबिर लवकर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक व महाराष्ट्र बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली. ठाण्यातील ‘जिज्ञासा ट्रस्ट’ ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या परिषदेची समन्वयक संस्था म्हणून गेली २० वर्ष कार्यरत आहे.

निवड झालेले प्रकल्प

ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकेंडरी शाळेच्या विराजित फुंडे आणि निविदा पगार यांच्या ‘इको फ्रेंडली मार्कर पेन’, तन्मय महाजन आणि वेदांत मळे यांच्या ‘शाश्वत गतीचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राची रचना’ व देवांशी गायकवाड आणि शुभ्र चव्हाण यांच्या ‘प्लांट फायबर इज द न्यू प्लास्टिक’ या तीन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. जयश्री सूर्यवंशी व संगीता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नौपाडा येथील डॉ. बेवेकर विद्यामंदिर शाळेच्या ‘घरपोच अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कंटेनरला पर्यायी व्यवस्था’ या या प्रकल्पाची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संजय तळेले त्यांनी मार्गदर्शन केले.

ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ५३ च्या रिया सकपाळ व सृष्टी मनोरे यांच्या ‘अपघात रक्षक टोपी’ या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. या विदयार्थ्यांना तानाजी शिंदे व गौतम गवई या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कुलच्या अनुष्का निंबाळकर व शिवम शेट्टी या विद्यार्थ्यांच्या ‘समजूया झाडांचे शास्त्र, सोडवुया ताणाचे रहस्य’ या प्रकल्पाची निवड झाली. या विद्यार्थ्यांना स्वाती प्रभू यांनी मार्गदर्शन केले.

श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेच्या सारा शेख आणि हसीब काझी या विद्यार्थ्यांच्या ‘झुरळांचे मानवी आरोग्य व स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम व त्यावरील नियंत्रणाचे उपाय’ या प्रकल्पाची निवड झाली असून यासाठी विद्या देवाडिगा व धनश्री तरटे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा :  

Back to top button