माले : वृत्तसंस्था : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जूंनी चीनला मालदीवच्या अधिकारातील हिंदी महासागराच्या क्षेत्रातील समुद्र तळाचे सर्वेक्षण आणि संशोधनाचा हक्क बहाल केला आहे.
मालदीव संसदीय निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जूंना प्रचंड बहुमताने विजय मिळाल्यानंतर चीनला आपल्या देशात मोकळे रान उपलब्ध करून देण्याचे त्यांनी ठरवून टाकलेले आहे. चीनच्या हिताचे निर्णय घेण्याची खुली सूटच त्यांना आता मिळाली आहे. चीनसह त्यांनी लष्करी करारही केला आहे.
श्रीलंकेने चीनबाबतचे आपले धोरण काहीसे कडक केल्याने हिंदी महासागरातील वावर तसेच खनिज संशोधनासाठी चीनला मालदीवची आवश्यकता होतीच. मोईज्जूंच्या निवडणुकीतील यशाने चीनचा रस्ता मोकळा झाला आहे. इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटीकडून 2011 मध्येच चीनने खनिज भांडारासाठी सागरी तळाचा शोध घेण्याचा हक्क प्राप्त केलेला आहे. सागरी तळाच्या 10 हजार चौकिमी क्षेत्रात पॉलिमेटिलिक सल्फाईडच्या संशोधनासाठी 15 वर्षांचा परवाना चीनला मिळालेला आहे. आता चीन मालदीवच्या सागरी हद्दीत समुद्रतळाशी या खनिजासह सोने, चांदी, शिसे, जस्त आणि तांबेही शोधणार आहे.