नाशिकमध्ये 10-11 डिंसेबरला राज्यस्तरीय महायोगोत्सव, 600 पेक्षा अधिक योगशिक्षकांची असणार उपस्थिती | पुढारी

नाशिकमध्ये 10-11 डिंसेबरला राज्यस्तरीय महायोगोत्सव, 600 पेक्षा अधिक योगशिक्षकांची असणार उपस्थिती

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा

योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघ आयोजित बहुप्रतीक्षेत असलेले पहिले राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन ‘महायोगोत्सव २०२२’ नाशिक येथे होणार आहे. शनिवार, रविवार दि.१० व ११ डिसेंबरला संत जनार्दन आश्रम, तपोवन पंचवटी येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या प्रेरणेतून हे संमेलन घेतले जात आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रातून येणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहाशेहून अधिक योगशिक्षकांची नोंद झाली आहे. हे सामाजिक कार्य असून या मेळाव्यासाठी दोन दिवसांचा सहभाग निधी नाममात्र ठेवण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सर्वांना चहा, नास्ता, दोन वेळेचे जेवण व परतीच्या प्रवासाला जातानाचे फूडपाकिटाचा समावेश आहे. तसेच कार्यक्रमात प्रमुख अतिथी वक्ते, पदाधिकारी, सहयोगी कार्यकर्ते, योगासन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ स्पर्धक या सर्वांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त संमेलनासाठी लागणारा सर्व खर्च योगशिक्षकांच्या सहभाग निधी, प्रायोजक व देणगीच्या माध्यमातून होणार आहे.

योगाच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जास्तीत जास्त योगशिक्षक तयार व्हावेत, समाजामध्ये आरोग्य संबंधी जाणीव जागृती निर्माण व्हावी, योगशिक्षकांच्या अडीअडचणी शासन दरबारी पोहोचवून त्यांचे निराकरण व्हावे अशा बहुविध उद्देशाने हा मेळावा घेण्यात येत आहे. यामध्ये तज्ञांची व्याख्याने, योगाशी संबंधित प्रात्यक्षिके, संशोधन पर निबंध, संगीत रजनी इत्यादी. दोन दिवसात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या महायोगोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान पुरस्कार प्राप्त व योग विद्या गुरुकुलचे कुलगुरू डॉ. विश्वासराव मंडलिक गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी शिवगोरक्ष योगपीठाचे महामंडलेश्वर १००८ शिवानंद महाराज, संत जनार्दन स्वामी आश्रमाचे अनंत विभूषित स्वामी माधवगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत. योगाचार्य अशोक पाटील हे संमेलनाध्यक्ष, डॉ.विशाल जाधव, स्वागताध्यक्ष असून राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष राहुल (अंबादास) येवला आहेत तर समन्वयक उत्तमराव अहिरे, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आहेत.

हेही वाचा :

Back to top button