Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या अडचणी वाढणार? | पुढारी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या अडचणी वाढणार?

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे आणि त्यांच्या कुटूबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत प्राथमिक चौकशी करण्याच्या मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यावर कथित बेहिशोबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवली आहे.

दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठाकरे कुटुंबीयांचे उत्पन्न आणि संपत्तीवर बोट ठेवत संपत्तीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप करून याप्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर सुरुवातीला न्यायालयाने रजिस्ट्रारच्या अहवालानुसार तुम्ही आमच्या काही शंकांचे निरसन करू शकणार नाहीत, त्यामुळे आम्ही तुम्हाला एखादा वकील द्यावा का? अशी विचारणा केली. त्यावर भिडे यांनी न्यायालयाने योग्य तो निर्णय घ्यावा. परंतु आपली युक्तिवाद करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवून अन्य खंडपीठासमोर दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले.

याचिकेत उपस्थित केले मुद्दे

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटंबीयांनी जमा केलेली मालमत्ता ही भ्रष्टाचार आणि चुकीच्या मार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे, असा आरोप याचिकेत करताना या संदर्भात ११ जुलै २०२२ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रारही केली होती, मात्र आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणून याचिका करण्यात आली आहे.

गौरी भिडे यांच्या आजोबांचा राजमुद्रा प्रकाशन ही प्रिंटिंग प्रेस होती. त्याच्या शेजारी ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीचा प्रबोधन प्रकाशनची प्रिंटिंग प्रेस होती. केवळ सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून अफाट संपत्ती, मातोश्रीची टोलेजंग इमारत, आलिशान गाड्या, फार्म हाऊस घेणे अशक्य आहे. दोघांचा व्यवसाय एकच असताना मिळकतीत फरक कसा, असा प्रश्नही भिडे यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.

Back to top button