लोकसभा निवडणुकीमुळे मद्यविक्री बंद : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश | पुढारी

लोकसभा निवडणुकीमुळे मद्यविक्री बंद : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या, मुक्त, शांतता, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होण्याच्या द़ृष्टीने, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून ते मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात व मावळ, पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे.

त्यापार्श्वभूमीवर सर्व मद्यविक्रीच्या, ताडीविक्रीच्या व इतर संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याअन्वये बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, तसेच मावळ, पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघात 11 मे रोजी सायंकाळी 6 पासून 13 मे रोजी सायंकाळी 6 पर्यंत, तसेच 4 जून रोजी संपूर्ण दिवसासाठी हे आदेश लागू राहतील.
निवडणूक निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाइन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करू शकतील.

परंतु, या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. तसेच, ठोक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींनी कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या
आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अनुज्ञप्ती धारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 व त्याअंतर्गत लोकप्रतिनिधित्व अधिनियमन 1951 अंतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button