दिव्याच्या डाळिंबाची मुंबईच्या बाजारात लाली | पुढारी

दिव्याच्या डाळिंबाची मुंबईच्या बाजारात लाली

नीलेश झेंडे

दिवे(पुणे) : दिवे परिसरात अलीकडे अंजीर, सीताफळ, पेरू या फळांचीच लागवड वाढत आहे. तेल्या रोगाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसल्याने अलीकडच्या काळात डाळिंबाकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, आहे त्या डाळिंबाची मुंबईच्या बाजारात लाली बघायला मिळत असून, त्यावर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत.

दिवे गावातील प्रगतशील शेतकरी श्रीरंगदादा झेंडे व शोभा झेंडे या दाम्पत्याने योग्य नियोजन करीत डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. या वर्षी हंगामाचे हे पाचवे वर्ष आहे. या वर्षी पाऊस लांबला तसेच उन्हाची तीव्रता जास्त होती. यासाठी झेंडे यांनी क्राँपकव्हरचा वापर करीत उन्हापासून आपल्या बागेचे संरक्षण केले. सध्या प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली असून, फळांचा आकार आणि रंग अप्रतिम आहे. त्यामुळे मुंबई मार्केटमध्ये झेंडे यांच्या डाळिंबाला मागणी आहे.

सध्या किलोला 90 ते 100 रुपये बाजारभाव मिळत आहे. आत्तापर्यंत तब्बल चार टनांपर्यंत उत्पादन मिळाले असून, अजून सहा टनांपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता आहे, असे झेंडे दाम्पत्याने सांगितले. झेंडे यांच्या डाळिंबाला चकाकी आणि गोडी अप्रतिम असल्याने मुंबई बाजारपेठेत ग्राहकांकडून विशेष मागणी असते, असे विक्रेते सोपान म्हस्कू कटके व ज्ञानेश्वर हरिभाऊ खेडेकर यांनी सांगितले.

बाग ठरतेय इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी

प्रत्येक झाडाला क्राँपकव्हर असल्याने दूरवरूनच ही बाग दृष्टीस पडते. ही बाग सध्या इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी असल्याने अनेक शेतकरी आवर्जून या बागेला भेट देत आहेत. या कामात झेंडे दाम्पत्याला आई लक्ष्मीबाई झेंडे, मुले अनिल झेंडे, सुनील झेंडे तसेच रूपाली झेंडे व स्वप्नाली झेंडे या मदत करीत असतात. सध्या सर्व माल व्यवस्थित पॅकिंग करून मुंबई बाजारपेठेत पाठविला जात आहे.

हेही वाचा

राजगुरुनगर : कॉलेजमधील खुन्नसवरून काढला मित्राचा काटा

पुणे : वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामाचे ट्रॅकिंग

पुणे : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा

Back to top button