226 किलो वजन घटवून बनली हिरोईन! | पुढारी

226 किलो वजन घटवून बनली हिरोईन!

वॉशिंग्टन : वजन वाढत असताना अनेकांना त्याची जाणीव होत नाही आणि एकदा का वजन वाढले की ते कमी करणे हे एक आव्हानच बनत असते. वजन वाढणे ही सध्या जगभरात गंभीर समस्या बनत चालली आहे. जास्त वजन वाढण्यामागे अनहेल्दी डायट आणि खराब लाइफस्टाइल ही प्रमुख कारणे आहेत. वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच ते कमी करणे कठीण आहे. क्रिस्टीना फिलिप्स नावाची महिला देखील अशा लोकांपैकी एक आहे, जिचे वजन खूप वाढले होते. तिच्या वाढत्या वजनामुळे तिला प्रत्येक काम करणे कठीण जात होते.

जगभरातील बहुतेक लोकांसाठी वजन कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. एके काळी तिचे वजन 317 किलोपेक्षाही अधिक झाले होते. आता तिने 226 किलो वजन घटवले असून ती हिरोईनही बनली आहे! क्रिस्टीना ही अमेरिकेतील मिसिसिपी येथील 32 वर्षीय महिला आहे. ती एकेकाळी जगातील सर्वात लठ्ठ महिलांपैकी एक मानली जात होती. क्रिस्टीनाला लहानपणापासूनच वजनाची समस्या होती. वयाच्या 12 व्या वर्षी तिचे वजन 136 किलो झाले होते. जसजशी ती मोठी होत गेली तसतसे तिचे वजन वाढत गेले आणि वयाच्या 22 व्या वर्षी तिचे वजन 317 किलोच्याहीवर पोहोचले.

साहजिकच इतक्या लहान वयात आणि एवढ्या वजनामुळे तिला उठणे, बसणे किंवा चालणेही कठीण झाले होते. क्रिस्टीनाचे 317 किलो वजन असल्याने तिचे आयुष्य खूप कठीण झाले होते. तिला स्वतःच्या घरात नीट चालताही येत नव्हते. एका टीव्ही शोमध्ये तिने आपला कठीण अनुभव सांगितला होता. काही पावले चालल्यावरही श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तिने त्या शोमध्ये सांगितले. ती स्वत: बाथरूममध्येही जाऊ शकत नव्हती आणि 2 वर्षे अंथरुणाला खिळून राहिली. क्रिस्टीनाने सांगितले की, लहानपणी तिला सतत भूक लागत असे, त्यामुळे तिचे पेरेंट्स तिला जंक फूड खायला द्यायचे. मात्र, हे खाता खाता आपल्या वाढत्या वजनाकडे तिने लक्ष दिले नाही आणि जंक फूड खाणे सुरूच ठेवले.

अखेरीस तिला स्वत:च्या वजनाची जाणीव झाली आणि तिने वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी तिला गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला, पण आधी थोडे वजन कमी करणे आवश्यक होते. यानंतर क्रिस्टीनाने हेल्दी डाएट घ्यायला सुरुवात केली आणि वजन कमी करण्यात यश मिळवले. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि हळूहळू तिचे वजन कमी होऊ लागले. क्रिस्टीना फिलिप्सचे वजन आता 91 किलोपर्यंत कमी झाले आहे. क्रिस्टीना तिच्या वजन कमी करण्याच्या यशाबद्दल अर्थातच आनंदी आहे!

Back to top button