हॅले धूमकेतूमुळे उल्का वर्षाव झाला सुरू | पुढारी

हॅले धूमकेतूमुळे उल्का वर्षाव झाला सुरू

वॉशिंग्टन : आगामी काळात पृथ्वी हॅले धूमकेतूच्या धूळ, खडकांनी भरलेल्या ढिगार्‍याजवळून जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर तेथून उल्का वर्षाव होईल, असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच असे अवकाशीय खडक जळून जातात. त्यांचे काही छोटे तुकडेच जमिनीवर कोसळू शकतात. 6 मे पर्यंत रात्री किंवा पहाटे हा उल्का वर्षाव दिसू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

अलाबामाच्या हंट्सविलेमधील ‘नासा’च्या मार्शल स्पेस फ्लाईट सेंटरमधून या उल्कांवर नजर ठेवली जात आहे. 4 मे च्या रात्रीही असा उल्का वर्षाव झाला. या उल्का हॅले धूमकेतूच्या ढिगार्‍यातूनच आलेल्या होत्या. हॅले धूमकेतू हा तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे. तो दर 75-76 वर्षांनी आपल्या सौरमालिकेच्या अंतर्गत भागातून जातो. या काळात त्याचा धूळ व खडकांचा ढिगारा आपले अवशेष मागे सोडत असतो.

ज्यावेळी पृथ्वी सूर्याभोवतीच्या आपल्या परिक्रमा मार्गावरून जात असते त्यावेळी या ढिगार्‍यातून पुढे जाते व त्यामुळे हा उल्का वर्षाव होतो. पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आल्याने हे खडक जळतात व त्यामुळे आकाशात प्रकाशाच्या रेषा दिसून येतात. या उल्का वर्षावाचे द़ृश्य दक्षिण गोलार्धातून अधिक चांगले दिसेल, असे संशोधकांनी म्हटले आहे. एका तासाच्या काळात अशा 30 उल्का दिसू शकतात. हॅलेचा धूमकेतू यापूर्वी 1986 मध्ये पृथ्वीवरून दिसला होता. आता तो 2061 मध्ये पुन्हा आपल्या सौरमालिकेतून जाईल.

Back to top button