पुणे : वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामाचे ट्रॅकिंग | पुढारी

पुणे : वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामाचे ट्रॅकिंग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या परिमंडळ आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य योजना पोहोचवण्याचे काम केले जाते. आता सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांचे आरोग्य विभागातर्फे दर महिन्याला प्रगतिपुस्तक तयार होणार आहे. त्यांच्या कामाचे ऑनलाईन ट्रॅकिंग केले जाणार आहे.

महापालिकेमध्ये 5 परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि 15 क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी शहरात आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असणा-या निकषांची पूर्तता, सर्वेक्षण, आशासेविका आणि कर्मचा-यांचे प्रशिक्षण, आरोग्य कार्यक्रमांचे नियोजन अशा विविध कामांची जबाबदारी वैद्यकीय अधिका-यांकडून पार पाडली जाते. कामाची गुणवत्ता आणि साध्य केलेले उद्दिष्ट याबाबत गुणांकन केले जाणार आहे.

वैद्यकीय अधिका-यांना 15 ऑगस्टपासून दरआठवड्याला ऑनलाईन सिस्टीमवर 30 आरोग्य कार्यक्रमांचे किती उद्दिष्ट साध्य केले, याची माहिती भरावी लागेल. त्यानुसार, 100 मार्कांचे मूल्यांकन केले जाईल. मूल्यांकन पध्दतीनुसार, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकही जाहीर केले जातील. त्यातून वैद्यकीय अधिका-यांना कामासाठी प्रोत्साहन मिळू शकेल, अशी माहिती आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार
यांनी दिली.

कोणत्या निकषांवर होणार मूल्यांकन?

  • गर्भवती मातांची नोंदणी आणि तपासणी
  • कुटुंब नियोजन
  • लसीकरण
  • नवमातांचे आरोग्य आणि औषधोपचार
  • अतिजोखमीचे आणि सहव्याधी असलेले रुग्ण
  • उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांचे रुग्ण
  • साथीच्या आजारांचे रुग्ण आणि उपाययोजना

सर्वसामान्य रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचाव्यात यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. शासकीय योजना, कार्यक्रम नागरिकांपर्यंत योग्यरितीने पोहोचत आहेत का, केंद्र आणि राज्य शासनाचे निकष पूर्ण होत आहेत का, हे ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातून समजू शकणार आहे. वैद्यकीय अधिका-यांना मूल्यांकन पध्दतीतून कामासाठी प्रोत्साहन मिळेल.

डॉ. भगवान पवार,
आरोग्य विभागप्रमुख, पुणे महापालिका

हेही वाचा

छत्रपती संभाजीनगर : कन्नड ग्रामीण पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरांच्या मुसक्या; १२ दुचाकी जप्त

पुणे : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा

अजित पवारांचा पुणे, कोल्हापूर, रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा

Back to top button