पुणे : काटी येथील आईच्या हत्येप्रकरणी मुलास जन्मठेपेची शिक्षा  | पुढारी

पुणे : काटी येथील आईच्या हत्येप्रकरणी मुलास जन्मठेपेची शिक्षा 

बारामती: पुढारी वृत्तसेवा: आईच्या हत्येप्रकरणी संदीप वेताळ मिसाळ (वय ३५, रा. भोगवस्ती, काटी, ता. इंदापूर) याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जे. पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दि. २४ जुलै २०१४ रोजी काटी येथील भोंगवस्ती येथे ही घटना घडली होती.
आई कलावती वेताळ मिसाळ यांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणी प्रदीप वेताळ मिसाळ याने फिर्य़ाद दिली होती. संदीप हा काहीही कामधंदा करत नसल्याने आईसोबत त्याचे वादविवाद होत असत. घटनेदिवशी प्रदीप हा सकाळी इंदापूर येथे महाविद्यालयात गेला. त्यावेळी आई व संदीप हे दोघेच घरी होते. प्रदीप हा दुपारी दीडच्या सुमारास घरी आला. तेव्हा संदीप घराबाहेर खुर्चीवर बसला होता. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. प्रदीप याने संदीप यास आईला काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर त्याने आईला कोणी तरी मारल्याचे सांगितले. प्रदीप याने नातेवाईक, शेजारी यांना बोलावून घरी कोणी आले होते का, याची खातरजमा केली. परंतु, या कालावधीत घरी कोणीही आले नसल्याचे दिसून आले. त्यावर संदीप यानेच ही घटना केल्याचे त्याच्या लक्षात आले.
इंदापूर पोलिसांनी त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. व्ही. काळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासामध्ये संदीप याने आई कलावती हिला कुदळीने मारहाण केली. कुऱ्हाडीने डोक्यात, तोंडावर, कपाळावर सपासप वार केले होते. तसेच घरातील रक्त पुसून पुरावा नष्ट केल्याचे समोर आले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये डाॅ. नामदेव गार्डे यांचा न्याय वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. हा खटला परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय पुराव्यावर आधारित होता. अॅड. जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधिश दरेकर यांनी संदीप मिसाळ याला खून प्रकरणी जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाला इंदापूरचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मयुर गायकवाड, सहाय्यक फौजदार एन. ए. नलवडे यांनी सहकार्य केले.
हेही वाचा 

Back to top button