चीनचे ‘चांगी-6’ यान चंद्राच्या दिशेने रवाना | पुढारी

चीनचे ‘चांगी-6’ यान चंद्राच्या दिशेने रवाना

बीजिंग : चीनने अमेरिकेबरोबरची आपली ‘स्पेस रेस’ आता वेगवान केली आहे. चीनने चंद्राच्या दुर्गम भागातून खडक-मातीचे नमुने घेऊन येण्यासाठी ‘चांगी-6’ हे यान पाठवले आहे. वेनचांग अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून हे ‘चांगी-6 रोबोटिक लुनार एक्सप्लोरेशन मिशन’ लाँच करण्यात आले. ही मोहीम 53 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ‘चांगी-6’ चे रोबोट चंद्राच्या दुर्गम, अंधार्‍या भागातून दोन किलो नमुने विश्लेषणासाठी गोळा करील.

ही मोहीम यशस्वी ठरली तर ते चीनचे अंतराळ क्षेत्रातील मोठेच यश मानले जाईल. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने चंद्राच्या इतक्या दूरवरील ठिकाणी जाऊन तेथील नमुने गोळा करून आणलेले नाहीत. चंद्राच्या चीनी देवीच्या नावावरून या मोहिमेचे नाव ‘चांग ई-6’ किंवा ‘चांगी-6’ असे ठेवण्यात आले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एटकेन बेसिनमधून या मोहिमेत खडक-मातीचे नमुने गोळा केले जातील. सध्या चंद्रावर अनेक देश आपल्या मोहिमा आखत आहेत.

भारताने आपल्या ‘चांद्रयान-3’ मोहिमेत विक्रम लँडरला यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून प्रज्ञान रोव्हरला चांद्रभूमीवर चालवलेही होते. जपाननेही आपली ‘स्लिम’ मोहीम यशस्वीरित्या राबवली. अमेरिका लवकरच ‘आर्टेमिस’ मोहिमेत चंद्रावर पुन्हा एकदा आपले अंतराळवीर पाठवणार आहे. चीनही चंद्राच्या शर्यतीत कुठेही मागे नाही.

Back to top button