उन्हाळ कांदा : यंदाही शेतकर्‍यांचा खर्च वाढला अन् उत्पादन घटले | पुढारी

उन्हाळ कांदा : यंदाही शेतकर्‍यांचा खर्च वाढला अन् उत्पादन घटले

नाशिक : श्याम उगले
नाशिक जिल्ह्यात यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत 50 हजार हेक्टरने उन्हाळ कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, यावर्षी थंडी, अवकाळी पाऊस, थुके, दव आदी समस्यांमुळे उन्हाळ कांद्याची उत्पादकता घटण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. राज्यातील कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले असले तरी कांद्याची उत्पादकता घटणार असल्यामुळे यावर्षीही शेतकर्‍यांचे खर्च वाढला उत्पादन घटले, अशी स्थिती राहणार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

नाशिक जिल्ह्यात कळवण, बागलाण, निफाड, येवला, सिन्नर, चांदवड हे उन्हाळ कांदा घेणारे प्रमुख तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याचे सरासरी क्षेत्र 1 लाख 70 हजार हेक्टर असून यावर्षी 2.11 लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदयाची लागवड झाली आहे. त्यात बागलाण व कळवण तालुक्यात सर्वाधिक लागवड आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात 1.60 लाख हेक्टरवर लागवड झाली होती.या हंगामात रांगड्या (लाल) कांद्याचे क्षेत्र वाढून त्याची उत्पादकताही वाढली. यामुळे एप्रिलच्या मध्यापर्यंत लाल कांद्याचा दबाव बाजार समित्यांमध्ये राहणार आहे. यामुळे उन्हाळ व लाल कांदा एकत्र बाजार समित्यांमध्ये विक्रीस आल्याने लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. उन्हाळ कांदा अधिक दिवस टिकत असल्यामुळे शेतकर्‍यांनी लाल कांदा संपल्यानंतर उन्हाळ कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन या क्षेत्रातील अभ्यासकांकडून केले जात आहे.

नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांदा साठवणुकीसाठी व्यापारी व शेतकरी यांच्याकडे साधारणपणे 17 लाख टन साठवण क्षमता आहे. चाळींमध्ये साठवलेला कांदा साधारणपणे जुलै ते डिसेंबरपर्यंत विक्रीसाठी आणला जातो. उर्वरित कांदा हा एप्रिल ते जून या काळामध्ये विक्रीसाठी येत असतो. नाशिक जिल्हयात साधारणपणे 35 लाख मेट्रिक टन उन्हाळ कांद्याचे उत्पादन होत असते. यावर्षी उन्हाळ कांद्याची उत्पादकता घटण्याची चर्चा असली तरी क्षेत्रातील झालेली वाढ बघता मे व जूनमध्ये जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांदा मोठ्याप्रमाणावर विक्रीसाठी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उन्हाळ कांद्याचे देशातील दर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांवरून ठरतात. याबाबीचा विचार करता मे व जूनमध्ये उन्हाळ कांद्याची आवक अधिक होऊन दर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरासरी 13 ते 15 रुपये दर
कांदा हे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकर्‍यांचे नगदी पीक आहे. तसेच अलिकडे सिंचनाची सोय असलेल्या भागातही उसाचे क्षेत्र कमी झाल्याने कांदा पीक घेतले जाते. यामुळे कांद्याचे उत्पादन अधिक होऊन दर कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटल्यास काही काळासाठी कांद्याचे दर गगनाला भीडतात. या चढउतारामुळे कांदा कायम चर्चेत राहत असला, तर मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता कांद्याला वर्षभरात सरोसरी केवळ 1350 ते 1500 रुपये क्विंटल असा दर मिळतो. मात्र, अधिक दराचा फायदा हा फार थोड्या शेतकर्‍यांना होतो व बहुतांश उत्पादकांना सरासरी 1000 रुपये क्विंटलच्या आत दर मिळत असतो.

उत्पादकता घटण्याची कारणे
उन्हाळ कांदा नोव्हेंबर ते जानेवारी या काळात लागवड केला जातो. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिथंडी, शितलहरी यामुळे धुक्याचे प्रमाण वाढून कांदा पिकावर करपा रोग पडला. यामुळे उन्हाळ कांद्याची उत्पादकता 20 ते 30 टक्के कमी होऊ शकते, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

कांदा साठवण क्षमतेत वाढ
दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट ते फेब—ुवारीपर्यंत कांद्याचे दर चढे असतात. तसेच उन्हाळ कांद्याच्या काढणी काळात म्हणजे एप्रिल व मेमध्ये कांद्याचे दर निचतम पातळीला असतात. त्यामुळे उन्हाळ कांदा काढल्यानंतर शेतकर्‍यांनी तो साठवून ठेवल्यास त्याला चांगले दर मिळू शकतील, या हेतुने सरकारकडून शंभर टक्के अनुदानावर कांदाचाळी बांधण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. यातून नाशिक जिल्ह्यात व्यापार्‍यांकडील व शेतकर्‍यांकडील कांदा चाळींमध्ये जवळपास 17 लाख मेट्रिक टन कांदा साठवण क्षमता आहे. उन्हाळ कांदा सहा महिने चाळींमध्ये साठवला जाऊ शकतो. यामुळे जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या वाढीव दराचा शेतकरी लाभ घेत असतात.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : काय आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास ? | कोल्हापूर उत्तर पोटनिवडनूक 2022

 

Back to top button