सोलापूर : कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस चार तास उशिरा; प्रवाशांना मन:स्ताप | पुढारी

सोलापूर : कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस चार तास उशिरा; प्रवाशांना मन:स्ताप

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मागील अनेक दिवसांपासून सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून मंगळवारी (दि.३०)  कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस चार तास उशिरा आल्याने याचा प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला.

कलबुर्गी-कोल्हापूर एक्सप्रेसच्या देखभाल दुरुस्तीस उशीर झाल्याने ही गाडी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी निघणारी गाडी, सकाळी १० वाजून चार मिनिटांनी कलबुर्गीतून सुटली. कोल्हापूरला दुपारी सव्वा दोनला पोचणारी गाडी सायंकाळी पाच वाजून ४४ मिनिटांनी पोहचली. तब्बल चार तास उशिरा ही गाडी पोहचल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, नेहमीप्रमाणे सुटणारी कलबुर्गी-कोल्हापूर एक्सप्रेस मंगळवार सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी कलबुर्गीतून निघते. पण मुळात कलबुर्गी येथूनच ही गाडी उशिराने सुटल्याने कोल्हापूरला देखील उशिराने पोचली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गोची झाली. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आला. वारंवार होणाऱ्या अशा प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तर कोल्हापूरकडे निघणारी गाडी दुपारी तीन वाजता सुटणे अपेक्षित होते, मात्र सायंकाळी सहा वाजून १६ मिनिटांनी सुटली. त्यामुळे सोलापूरला रात्री आठ वाजून ४५ मिनिटांनी पोचणारी गाडी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी पोचली तर या गाडीस कलबुर्गीला १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ही गाडी रात्री एक वाजून सहा मिनिटांनी पोहोचल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

एकीकडे कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या तोकडी आहे. त्यात या गाडीचे वेळापत्रक प्रवाशांच्या दृष्टीने चुकीचे आहे. कारण सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी सुटते तर कोल्हापूर ला दुपारी दोन वाजता पोहचते. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी यांची कोणतीही कामे होत नाहीत. सोलापूरमधील बरेच विद्यार्थी कोल्हापूर विद्यापीठात तसेच मिरजेत वैद्यकीय शिक्षण घेतात. त्यामुळे गाडीचे वेळापत्रक व्यवस्थित होत नसल्याने प्रवाशांची दुहेरी कोंडी होत आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे वेळापत्रक होते. त्याप्रमाणे या गाडीचे वेळापत्रक पूर्ववत करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

दरम्यान सोलापूर-कोल्हापूर दरम्यान सकाळी साडेसात वाजेपर्यंत सोलापूर-मंगळवेढा मार्गे कोल्हापूरकडे एकही एसटी नाही. तर दुसरीकडे मोहोळ मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या बऱ्याच एसटी आहेत. मोहोळ मार्गे जायचे झाले तर जवळपास दीड तास प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे एसटी प्रशासनाने सोलापूर-मंगळवेढा मार्गे कोल्हापूरकडे एसटी गाड्या सोडाव्यात, अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा :

Back to top button