Lok Sabha Election | ठाणे : लोकसभेचा सस्पेन्स वाढला; भाजपकडून नामनिर्देशन अर्जाची खरेदी! | पुढारी

Lok Sabha Election | ठाणे : लोकसभेचा सस्पेन्स वाढला; भाजपकडून नामनिर्देशन अर्जाची खरेदी!

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेकडे जाणार की, या जागेवर भाजप आपला दावा कायम ठेवणार? हे अद्याप निश्चित झाले नसताना आज (दि.30) मंगळवारी भाजपकडून नामनिर्देशन अर्ज खरेदी करण्यात आला आहे. भाजपच्या धक्कातंत्रामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ५ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले असून यामध्ये वंचित बहुजन आघाडी -2, आझाद समाज पार्टी -1, अपक्ष -1 असे अर्ज वाटप करण्यात आले असून यामध्ये भारतीय जनता पार्टीचाही समावेश आहे. भाजपकडून 1 नामनिर्देशन अर्ज घेण्यात आला आहे.

ठाण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे. तर आमदार प्रताप सरनाईक यांचेही नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे या मतदार संघासाठी भाजप अजूनही आशादायी असल्याने भाजपकडून इच्छुक असलेल्या माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी देखील आपला प्रचार सुरू ठेवला असल्याने ठाणे लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स वाढला आहे.

ठाणे लोकसभेची जागा शिंदेच्या शिवसेनेला गेली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी,भाजप या जागेसाठी अजूनही आशादायी आहे. त्यामुळेच भाजपकडून भेटीगाठी आणि छोट्या छोट्या बैठकांचे सत्र सुरूच ठेवण्यात आले आहे . ऐनवेळी हा मतदार संघ जर भाजपच्या वाट्याला आलाच तर प्रचाराला दिवस कमी पडू नयेत यासाठी भाजपकडून ही रणनिती आखण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजन विचारे यांच्यासमोर शिंदेच्या शिवसेनेकडून अनेक नवे चर्चेत असली तरी यावर भाजपकडून पसंतीची मोहर उमटत नसल्याने अजूनही या मतदार संघांचा तिढा सुटलेला नाही.

दोन दिवसांपूर्वी माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. मात्र, म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांच्या नावांना भाजपच्या गोटातून अजूनही ग्रीन सिग्नल न मिळाल्याने हा तिढा सुटण्याच्या ऐवजी वाढला आहे.

पालघरसाठी मंगळवारी सकाळी राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे पालघर लोकसभा मतदार संघ हा भाजपला जाण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपच्या बदल्यात ठाणे हे शिंदेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता वाढली आहे. याची औपचारिक घोषणा दोन दिवसांमध्ये होण्याची चिन्हे आहेत. मात्र मंगळवारी नामनिर्देशन अर्ज घेऊन शेवटपर्यंत भाजप ठाणे लोकसभेसाठी आग्रही असल्याचे पक्षाकडून एकप्रकारे इशाराच देण्यात आला आहे.

कल्याण लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ .श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. अनेक मतदार संघामध्ये उमेदवार निश्चित करताना भाजपच्या सर्व्हेक्षणाचे निकष लावले जात असल्याने इतर मतदार संघाप्रमाणे ठाणे आणि पालघर लोकसभा मतदार संघासाठीही भाजपच्याच सर्व्हेक्षणाचे निकष लावले जात असल्याने या दोन्ही जागांचा तिढा त्यामुळेच सुटलेला नाही.

हेही वाचा :

Back to top button