वाढत्या अपेक्षा मानवाच्या दुःखाचे मूळ कारण : आचार्य विशुद्धसागर महाराज | पुढारी

वाढत्या अपेक्षा मानवाच्या दुःखाचे मूळ कारण : आचार्य विशुद्धसागर महाराज

राजकुमार चौगुले

किणी : मनात अतीव इच्छा असली की दुःख निर्माण होते, जे काही मिळते ते भाग्याने मिळते. यासाठी दररोज पुण्यकर्म करण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन आचार्य विशुद्धसागर महाराज यांनी पेठवडगाव येथील प्रवचनात केले. अध्यात्म योगी चर्याशिरोमनी आचार्य १०८ विशुद्धसागर महाराज यांचे आज (दि.३०)  सकाळी पेठवडगाव येथे २९ मुनिंसह आगमन झाले. वाठार नाक्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सवाद्य मिरवणुकीने त्यांना श्री शांतीनाथ जिनमंदिरात नेण्यात आले. यावेळी उपस्थित श्रावक श्रविकांना त्यांनी संबोधित केले.

ते म्हणाले की, वाढत्या अपेक्षा हे मानवी जीवनाच्या दुःखाचे मूळ कारण आहे. तुम्ही अपेक्षा ठेवा अथवा ठेवू नका. तुमच्या भाग्यात आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे. पण व्यर्थ अपेक्षा ठेवाल, तर पदरी दुःखच येणार आहे. आपले भाग्य बदलण्याचे सामर्थ्य फक्त पुण्यकर्मातच आहे. ते पुण्यकर्म करायला प्रवृत्त करण्याची क्षमता फक्त भगवंताच्या हातात आहे. यासाठी संतसंगती आणि देवदर्शन करत रहा. दगडाला जर देवत्व प्राप्त होत असेल. तर मनुष्याला का शक्य नाही, याचा प्रत्येकाने विचार करावा आणि आपले चांगले काम करत रहावे. असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन महाराजांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मुनिसंघाची पाद्यपूजा करण्यात आली. तर महिला श्राविकांकडून मुनिसंघास अर्घ्य अर्पण करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील हुकेरी, पेठवडगाव दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष सत्यंधर भोरे, अमोल हुक्केरी, राजेंद्र बुकशेट, अॅड. उदय महाजन, नंदकुमार ढवळे, संतोष लडगे, राजकुमार पाटील, संजय पाटील  यांच्यासह वडगाव शहर व परिसरातील श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button