रत्नागिरी : मुलाच्या प्रियसीचा खून केल्याप्रकरणी बापाला जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

रत्नागिरी : मुलाच्या प्रियसीचा खून केल्याप्रकरणी बापाला जन्मठेपेची शिक्षा

साडवली; पुढारी वृत्तसेवा : मुलाचे तरूणीसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने मुलाच्या बापाने त्या तरूणीचा गळा आवळून तिचा खून करून मृतदेह जंगलमय भागात फेकून दिला होता. हा गुन्हा डिसेंबर २०१८ साली देवरूखनजीक असणाऱ्या मोगरवणे येथील जंगलमय भागात घडला होता. या केसचा निकाल पाच वर्षांनी आज (दि.३०) लागला असून रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सुनील रामचंद्र गुरव (वय-५०, रा. फणसवणे गुरववाडी ता. संंगमेश्वर) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच या आरोपीला १० हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या खून प्रकरणातील आरोपी सुनील गुरव याचा मुलगा महेंद्र गुरव याचे कसबा येथील विशाखा अजय महाडिक (वय १८) हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध सुनील गुरव याला मान्य नव्हते. सुनील गुरव याने मुंबईवरून येवून १ डिसेंबर २०१८ रोजी विशाखाला फोन केला. व देवरूख बसस्थानक येथे बोलावले. तेथून तिला रिक्षातून घेवून तो देवरूखनजीक असणाऱ्या मोगरवणे येथील जंगलमय भागात घेवून गेला. याठिकाणी गेल्यावर सुनीलने पेयातून विशाखाला झोपेच्या गोळ्या दिल्या. व ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून तिचा खून केला.

विशाखा मृत्यूनंतर तिचा मृतदेह सुनीलने त्याच जंगलमय भागात टाकून दिला होता. याचवेळी विशाखाचे वडील अजय आत्माराम महाडिक यांनी आपली मुलगी विशाखा ही बेपत्ता असल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस स्थानकात देवून सुनील गुरव याच्यावर संशय व्यक्त केला. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सुनील याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच  विशाखाला आपणच मारल्याची कबूली त्याने दिली होती. यानंतर देवरूख पोलीस स्थानकात सुनील गुरव याच्याविरोधात भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या केसचा निकाल पाच वर्षांनी मंगळवारी (दि.३०) लागला असून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सुनील गुरव याला जन्मठेपेची शिक्षा तसेच १० हजाराचा दंड ठोठावला आहे.

 या केसचे कामकाज सरकारी वकील अँड. प्रफुल्ल साळवी यांनी पाहिले. तर या प्रकरणाचा तपास देवरूख पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केला. दरम्यान, या खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार पवन भोई, अनिल पाटेकर, प्रसाद अपणकर यांचा देवरूखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी देवरूख पोलीस स्थानकात सत्कार केला.

हेही वाचा :

Back to top button