जोतिबा डोंगर : जोतिबाच्या सेवेत नवीन अश्व दाखल | पुढारी

जोतिबा डोंगर : जोतिबाच्या सेवेत नवीन अश्व दाखल

जोतिबा डोंगर : पुढारी वृत्तसेवा

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या लावाजम्यातील ‘जय’ या अश्वाचे थाटामाटात आगमन झाले. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जोतिबाच्या प्रत्येक धार्मिक विधीवेळी सर्वात पुढे असणार्‍या ‘उन्मेश’ अश्वाचे निधन झाल्याने नवीन अश्वाची भाविकांना प्रतीक्षा होती. जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक या अश्वाचे दर्शन घेतात.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रयत्न करून चैत्र पौर्णिमेच्या यात्रेपूर्वीच नवीन अश्व जोतिबाच्या सेवेत रुजू केला आहे. करवीर तालुक्यातील निगवे येथील हिंमत बहाद्दर चव्हाण यांनी 20 वर्षांपासून जोतिबाच्या सेवेत असणारे आतापर्यंत तीन अश्व देवस्थान समितीला दिले आहेत. आजचा हा चौथा अश्व चव्हाण सरकारांनी जोतिबाला अर्पण केला आहे. या अश्वाचे आज जोतिबा डोंगरावर पुजारीवर्गाकडून आणि देवस्थान समितीकडून विधिवत पूजन करून स्वागत करण्यात आले.

‘जय’ अवघा 13 महिन्यांचा, पांढरा शुभ्र असून, त्याला मध्य प्रदेश येथून आणले असल्याची माहिती अश्वाचे दानकर्ते रणजितसिंह चव्हाण यांनी दिली. अश्वाचे मंदिर सभोवताली शाही स्वागत करून प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, दीपक म्हेत्तर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र बुणे, गावकर अध्यक्ष बळीराम सांगळे, अश्वाचे सेवेकरी किशोर भोसले उपस्थित होते

जोतिबा यात्रा कालावधीत मोफत दुचाकी चेकअप कॅम्प

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जोतिबा यात्रा कालावधीत 15 व 16 एप्रिल रोजी यात्रेच्?या मार्गावर दोन ठिकाणी मोफत दुचाकी दुरुस्ती व चेकअप कॅम्पचे आयोजन केल्याची माहिती टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सरनाईक म्हणाले, गेली 20 वर्षे हा उपक्रम सुरू आहे. यात्रा कालावधीत दोन दिवस केर्लीपासून ते जोतिबापर्यंतच्या मार्गावर गायमुख परिसरात हा कॅम्प असेल. मार्गावर ठिकठिकाणी मेकॅनिक थांबतील. भाविकांची दुचाकी बंद पडली, तर तातडीने दुरुस्त करून दिली जाईल. जोतिबा डोंगर ते गिरोली या मार्गावरही अशीच सेवा देण्यात येणार आहे. यावेळी निशिकांत आंब—े, विजय पाटील, संदीप रसाळे, रमेश बावले, नवदीप गाजरे आदी उपस्थित होते.

Back to top button