Issue of stray dogs : भटके आणि पाळीव कुत्रे यांच्याबाबतच्या सद्यस्थितीतील धोरणांचा पुनर्विचार आवश्यक | Blog | पुढारी

Issue of stray dogs : भटके आणि पाळीव कुत्रे यांच्याबाबतच्या सद्यस्थितीतील धोरणांचा पुनर्विचार आवश्यक | Blog

उमेश जगन्नाथराव कहाळेकर

एक निष्ठावान सोबती- अर्थात कुत्रा, आपल्या घरी असला तर त्यामुळे घरातील सर्वांनाच आनंद मिळत असतो.पाळीव प्राणी, विशेषतः पाळीव कुत्रे तणाव कमी करू शकतात, हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात आणि मुलांना त्यांच्या भावनिक आणि सामाजिक कौशल्य वाढीसाठी मदत करू शकतात. मात्र, आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येसोबत भटक्या कुत्र्यांची समस्याही समोर येत आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, आपल्या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांची एकूण संख्या घटली आहे, परंतु महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये वाढ झाली आहे. देशात रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या अंदाजे १७१ लाख आहे. रस्त्यावरील कुत्र्यांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशात आहे, तर महाराष्ट्रात ही संख्या सुमारे १२.७६ लाख आहे. आपल्या देशात 2021 मध्ये 17.01 लाख कुत्रे चावल्याच्या नोंदी आहेत. (Issue of stray dogs)

संबंधित बातम्या

जेव्हा एका सोसायटीच्या आवारात रस्त्यावरील कुत्र्यांनी सात वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले, तेंव्हा पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या प्रकर्षाने नागरिकांच्या लक्षात आली. सोसायटीतील रहिवाशांना सुरक्षेची चिंता वाटू लागली. रहिवाशांना सोसायटीतील विविध क्षेत्रे आणि सुविधांचा वापर करणे सुरक्षित वाटेनासे झाले. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदरील सोसायटीच्या याचिकाकर्त्याला सोसायटीमधील कुत्रे परत सोसायटीच्या आवारात सोडण्यासंबंधीच्या पूर्व आदेशात बदल करण्यासाठी पुन: माननीय मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.

पर्यावरणाचे प्रश्न महत्त्वाचे | Issue of stray dogs

नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच भटक्या कुत्र्यांशी संबंधित पर्यावरणाचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. भटक्या कुत्र्यांच्या विष्ठेशी संबंधित वैज्ञानिक अभ्यास हा पर्यावरणासाठी चिंतेचा विषय आहे. शहरी भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे शहरात २ लाखांहून अधिक कुत्रे आहेत. हीच परिस्थिती जवळपास सर्वच मेट्रो शहरांमध्ये असू शकते. सरासरी, एक कुत्रा दररोज 200 ते 300 ग्रॅम कचरा उत्सर्जित करतो. कुत्र्याच्या एक ग्रॅम कचऱ्यामध्ये सुमारे 23 दशलक्ष कोलिफॉर्म बॅक्टेरिया असतात, जे मानवी कचऱ्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट असतात. निरोगी आतडे असलेला कुत्रा त्याच्या उच्च-प्रथिने आहारातील पोषक तत्वे शोषून घेतो. मागे जे उरते ते म्हणजे दुर्गंधीयुक्त मल, जो अम्लीय, विघटित होण्यास मंद आणि जीवाणूयुक्त असतो. यात कुत्र्याच्या पचनसंस्थेतील कर्बोदकांमधे, फायबर, प्रथिने आणि चरबीसह तीन-चतुर्थांश पाणी आणि न पचलेले अन्न असते. तसेच पचनासाठी आवश्यक असलेल्या निवासी जीवाणूंची विस्तृत श्रेणी देखील उपस्थित असते. जर कुत्र्यांना कृमी किंवा इतर रोगजनक सूक्ष्मजंतूंचा संसर्ग झाला असेल तर ते त्यांच्या विष्ठा आणि लघवीमध्ये असू शकतात. पावसाच्या पाण्यासोबत ही संसर्ग असलेली विष्ठा आणि लघवी जलसाठ्यामध्ये जाऊ शकते, ज्यामुळे आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होतो.

कुत्र्यांच्या मलमूत्रातील घटक नदीत | Issue of stray dogs

कुत्र्याची विष्ठा आणि लघवीचा कचरा हा नदीचे पाणी आणि भूजल दूषित होण्याशी संबंधित आहे. शहरी नायट्रोजन निक्षेपामध्ये कुत्र्यांच्या मलमूत्राचा सहभाग आणि त्यांचे होणारे व्यापक परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. हार्मोन्स, बॅक्टेरिया आणि यूरिक ऍसिड हे सर्व कुत्र्याच्या मूत्रात असतात कुत्र्याच्या मूत्रातून विशिष्ट आणि अप्रिय गंध निर्माण होतो. कुत्र्यांच्या मलमूत्रातील घटक पावसाच्या पाण्याद्वारे नदीत जातात. त्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये नको असलेल्या जलीय तणांची वाढ होऊ शकते.

अंगणात कुत्र्याचे मलमूत्र करणे देखील धोकादायक आहे. आपल्या अंगणातील अथवा सोसायटीतील हिरवळीवर जर कुत्र्याची विष्ठा राहिली तर त्यामध्ये परजीवी अंडी जास्त काळ टिकून राहतात व अशा हिरवळीवर अथवा मातीवर मुले अनवाणी चालली अथवा खेळली तर  हुकवर्म्स, रींगवर्म्स आणि टेपवर्म्स सारख्या परजीवींच्या संपर्कात येण्याची शक्यता असू शकते.

कुत्र्याच्या मलमूत्र कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची एक पद्धत म्हणजे कंपोस्टिंग डॉग वेस्ट आहे, ज्यामुळे पर्यावरण सुधारू शकते. उष्णता, सूक्ष्मजंतू, ओलावा आणि ऑक्सिजन यासारख्या योग्य परिस्थिती दिल्यास, कुत्र्याचे मलमूत्र जवळजवळ दोन महिन्यांत विघटित होते. तथापि, कुत्र्यांचे घन विष्ठेचे कचऱ्याचे विघटन घरगुती कचऱ्यासोबत न करता स्वतंत्रपणे करण्याची शिफारस केली जाते.

रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माणसाच्या झोपेच्या चक्रामध्ये व्यत्यय येऊ शकतो. “रामलीला मैदान विरुद्ध गृह सचिव, भारत संघ” या ऐतिहासिक प्रकरणात अनुच्छेद 21 (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत झोपण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य करण्यात आला आहे. तथापि कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांची झोपमोड होत असेल तर काय करावे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भटक्या कुत्र्यांविषयी सध्याच्या नियमांमुळे सोसायटीमधील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या नियमांमुळे भटक्या कुत्र्यांबाबत सहानुभूती वाढण्यापेक्षा ती कमी होत आहे की काय असा प्रश्न पडतो.

कुत्रे हे मानवी रेबीज मृत्यूचे मुख्य स्त्रोत

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणते की कुत्रे हे मानवी रेबीज मृत्यूचे मुख्य स्त्रोत आहेत, 99 टक्के रेबीज कुत्र्यांमुळे मानवांमध्ये पसरतात. 2022 मध्ये पुण्यात रेबीजमुळे 19 मृत्यू झाले होते. जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत महाराष्ट्रात अधिकृतपणे 3,89,065 कुत्रे चावल्याची नोंद झाली आहे. खाजगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये, रेबीज लसीच्या एका डोससाठी सुमारे ₹350-₹400 इतका खर्च येतो, त्यामुळे 5 डोसची किंमत सुमारे ₹1,700-₹2,000 होते. कुत्र्यांचे नसबंदी ही एक शस्त्रक्रिया आहे जी कुत्र्यांचे पुनरुत्पादक अवयव काढून टाकते जेणेकरून त्यांना पुनरुत्पादन होऊ नये. प्रत्येक कुत्रा पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी पालिकेला 1500 रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येतो.

भटक्या कुत्र्यांच्या धोक्याच्या परिणामांमध्ये गुंतलेली आर्थिक बाजू हा संशोधनाचा विषय असू शकतो. राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय स्तरावर भटक्या कुत्र्यांसाठी किती मनुष्य-तास गुंतले आहेत आणि वाया जात आहेत याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. भटका कुत्रा चावल्या गेलेल्या व्यक्तीस होणारा शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास आणि त्या व्यक्तीचा होणारा वेळेचा अपव्यय या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

भटके कुत्रे धोरणांचा पुनर्विचार व्हावा

भटक्या कुत्र्यांमुळे होणारे पाणी प्रदूषण, भूजल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, नागरिकांचे आरोग्य, कुत्रे पकडण्यासाठी आणि नसबंदी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि आर्थिक स्थिती, सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची मते इत्यादी बाबींचा शास्त्रीय अभ्यास करणे व त्या अनुषंगाने पर्यावरण तज्ञांशी सल्लामसलत करून योग्य ते धोरण शासनाच्या पशुसंवर्धन विभाग तसेच प्राणी कल्याण मंडळाने तयार करणे जरुरीचे झाले आहे. भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्याबाबतच्या सद्यस्थितीतील धोरणांचा पुनर्विचार व्हावा ही विनंती.

हेही वाचा

Back to top button