कुत्रा भुंकू लागला अन्.. केळ्यांच्या घडांमधून जे समाेर आले ते पाहून पाेलिसही चक्रावले | पुढारी

कुत्रा भुंकू लागला अन्.. केळ्यांच्या घडांमधून जे समाेर आले ते पाहून पाेलिसही चक्रावले

रोम : पोलिसांसोबत असलेल्या श्वान अर्थात कुत्र्यामुळे एका मोठ्या तस्करीचा पदाफार्श झाला आहे. इटलीमधील बंदरावर तब्बल 70 टन केळी असलेले कंटेनर पोहोचले. हे कंटेनर पाहून पोलिसांचा संशय बळावला. मात्र, दक्ष श्वानामुळे ही प्रचंड तस्करीची घटना समोर आली आहे. गियोइया ताऊरो या बंदरावर केळ्यांनी भरलेले दोन मोठे कंटेनर पोहोचले. वास्तविक केळ्यांची निर्यात करणार्‍या या कंपनीने यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात केळ्यांची निर्यात केलेली नव्हती.

एवढा मोठा साठा कुठल्या देशात पाठवला जाणार आहे, हे पोलिसांनाही समजले नव्हते. त्यामुळेच पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले. त्यांनी कंटेनरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांसोबत जोएल नावाचा श्वानही होता. तो कंटेनरवर चढला आणि जोरजोरात भुंकू लागला. पोलिसांचा संशय आता पक्का होत गेला. त्यांनी केळ्यांचे घड भराभर बाजूला करणे सुरू केले. त्यानंतर त्यांनी जे पाहिले त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

जोएलच्या मदतीने केळ्यांच्या घडांमधून कोकेनचा साठा समोर आला होता. या केळ्यांमध्ये तब्बल 2,700 किलोचे अमली पदार्थ सापडले. पोलिसांनी ते जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत याची किंमत 7,200 कोटींच्या घरात आहे. जोएल भुंकला नसता, तर केळ्यांसोबत असलेले अमली पदार्थांचा साठा इटलीहून जॉर्जियाला आणि तिथून पुढे अर्मेनियाला गेला असता. गियोइया ताऊरो बंदरावर मोठ्या प्रमाणात तस्करी चालते. त्यामुळे या बंदरावर पोलिसांची करडी नजर असते. एखाद्या चित्रपटातील द़ृश्य वाटावे अशी ही घटना. 2021 पासून आतापर्यंत गियोइया ताऊरो बंदरात 37 टन कोकेन पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

Back to top button