मजबूत भारत घडवण्यासाठी भाजपला मत द्या : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

मजबूत भारत घडवण्यासाठी भाजपला मत द्या : उपमुख्यमंत्री फडणवीस

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : भारत देशाकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत राहिली नाही, अशा कणखर नेतृत्वाची सध्या देशाला गरज असून असे नेतृत्व फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवून जीवनमान उंचावण्याचे काम दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारने ५० लाख कोटी रुपये सिंचन योजनांसाठी दिल्याने सर्व सिंचन योजना पूर्ण होत असून शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. पुढील काळातही सिंचन योजनासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.

सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपक साळुखे -पाटील, आमदार जयकुमार गोरे, कल्याण काळे, चेतनसिह केदार दौलत, शितोळ भाऊसाहेब रूपनर, राजश्री ताई नागणे, योगेश खटकाळे, राणीताई माने, आप्पासाहेव देशमुख, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, लोकसभेची निवडणूक निंबाळकर आणि मोहिते यांच्यामधील नाही, ही देशाची निवडणूक आहे. विविध पक्षाची मोट बांधून महायुती तयार झाली आहे. पंतप्रधान मोदी यांचे मजबूत इंजन असणारी ही महायुती आहे. सर्वच समाजाला या गाडीमध्ये बसण्याची संधी आहे. दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात, २६ पक्षाचे इंजिन आहे. पण प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतो, माझं इंजिन आहे. त्यामुळे त्यांच्या इंजिनाला डबे नाहीत. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी व प्रियांका गांधी, शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे असतील, यामुळे सर्वसामान्य माणसाला त्यामध्ये जागा नाही, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले,  पंतप्रधान मोदी यांनी २० कोटी लोकांना कच्च्या घरातून पक्या घरात आणलं. ५० कोटी लोकांच्या घरी चुलीऐवजी गॅस उपलब्ध करून दिला. ५५ कोटी लोकांना शौचालये बांधून दिली. पाच लाखपर्यंतची शस्त्रक्रिया मोफत करून दिली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात लस उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकाचे जीव वाचले,  हे सर्व डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी यांना मत द्या, असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी यावेळी केले.

हेही वाचा :

Back to top button