छत्रपती संभाजीनगर; राहुल जांगडे : घरात कुत्रा, मांजर पाळण्याची अनेकांना हौस असते. परंतु, जर त्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण केलेले नसेल तर मात्र,अगदी घरातल्या माऊ किंवा टॉमीपासूनही रेबीजसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञ म्हणतात, वेळेत लसीकरणासोबतच आपल्या टॉमीचे भटक्या प्राण्यांपासूनदेखील संरक्षण करणे जरुरी असते.
दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जगभरात रेबिज दिन साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे जगभरातील लोकांना रेबिजचे धोके आणि लसीचे फायदे याविषयी जागरूक करणे आहे. यावर्षीची थीम ऑल फॉर वन, वन हेल्थ फॉर ऑल आहे.
तज्ज्ञ म्हणतात, संक्रमित प्राण्यांच्या लाळेतील रॅबडो व्हायरसव्दारे पसरणारा रेबीज हा गंभीर आजार आहे. जो की कुत्रे, मांजरी आणि माकडांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. बहुतांश म्हणजेच तब्बल 95 ते 99 टक्के प्रकरणांमध्ये रेबिजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो. भटके कुत्रे असतील किंवा पाळीव श्वान त्यांना रेबिजची लस दिलेली नसेल आणि तो संक्रमित होऊन जेव्हा कुणाचा चावा घेतो तेव्हा रेबिजसारखा गंभीर आजार होण्याचा धोका अधिक असतो. रेबीजमुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढली आहे. लसीकरण करून रेबिजचा धोका कमी करता येतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दर महिन्याला कुत्र्याने चावा घेतलेले सुमारे 700 ते 800 रुग्ण उपचारासाठी येतात, अशी माहिती विभागातील डॉक्टरांनी दिली. मनपाच्या सिडको एन8 आरोग्य केंद्रात जुलै ते 27 सप्टेंबर रोजी पर्यंत कुत्र्याने चावा घेतलेले तब्बल 498 रुग्ण आल्याची माहिती केंद्रप्रमुख डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली.
कुत्रा रागीट होतो, लाळ गळते. सरळ चावा घेणे सुरू करतो. पाळीव श्वान मालकाने सांगितलेले काहीच ऐकत नाही. खाणे-पिणे सोडतो. मुख्य म्हणजे पाण्याला खूप घाबरतो. अशा वेळी त्वरित पशुवैद्यकांकडून श्वानाची तपासणी करून घ्यावी.
भटक्या किंवा पाळीव कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना.
कुत्र्याने चावा घेतल्याने रेबिजसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
कुत्र्याने चावा घेतलेली जागा सतत साबन व पाण्याने 10 मिनिटे धुतली पाहिजे.
यानंतर जखमेवर अँटिबॅक्टेरियल किंवा कोणतीही जखम भरणारी क्रिम लावू शकता.
तातडीने डॉक्टरांना दाखवावे. कुत्रा चावल्यावर रेबिजविरोधी लस (एआरव्ही)
24 तासांच्या आत दिली पाहिजे.
कुत्रे, मांजरी, माकडे, वटवाघूळ अशा सर्वच प्राण्यांपासून रेबिजचा धोका असतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. अन्यथा तुमच्या टॉमी किंवा मांजराने चावा घेतल्यावरही रेबिज होण्याची शक्यता आहे.
– डॉ. विनोद चावरे,
एम. डी. मेडिसिन.श्वान तीन महिन्यांचे झाल्यानंतर त्यांचे लसीकरण करून घ्यावे, त्यानंतर पुढे आयुष्यभर दरवर्षी एक बुस्टर लस देत राहावे. तुमच्या पाळीव श्वानास भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास तातडीने पशुवैद्यकांना दाखवून परत रेबीजची लस द्यावी.
– डॉ. गणेश चेडे,
पशुवैद्यक