गाेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवेकरांशी साधणार लाईव्ह संवाद | पुढारी

गाेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवेकरांशी साधणार लाईव्ह संवाद

पणजी, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 6 रोजी दुपारी साडेचार वाजता उत्तर गोव्यातील 20 मतदारसंघातील मतदारांना थेट प्रक्षेपण पद्धतीने संबोधित करणार आहेत. यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान मोदी दक्षिण गोव्यातील वीस मतदारसंघात थेट प्रक्षेपण पद्धतीनेच मतदारांशी संवाद साधणार आहेत.

उत्तर गोव्यातील संबोधनासाठी साखळी येथे खास व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सह प्रभारी दर्शना जरदोश, पक्षाचे राज्य प्रभारी सी. टी. रवी आदी उपस्थित राहतील. फडणवीस, मुख्यमंत्री आणि तानावडे यांच्या भाषणानंतर पंतप्रधान वीस मतदारसंघातील मतदारांना उद्देशून भाषण करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाविषयी राज्यभरात उत्सुकता आहे. गेले दशकभर भाजपची सत्ता राज्यावर आहे. राज्याला भेड

सावणाऱ्या काही प्रश्नांविषयी पंतप्रधान कोणते मार्गदर्शन करतील याकडे मतदारांचे डोळे लागून राहिलेले आहेत. पंतप्रधानांचे भाषण ऐकता यावे आणि पाहता यावे यासाठी प्रत्येक मतदारसंघात एका ठिकाणी कोविड नियमावलीचे पालन करून प्रत्येक ठिकाणी पाचशे जणांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यासाठीही अशीच व्यवस्था असेल.

 

दरम्यान भारतीय जनता पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा (संकल्पनामा) रविवारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे. गडकरी दिवसभराच्या प्रचार दौऱ्‍यावर राज्यात येणार आहेत. या जाहीरनाम्यासाठी राज्यभरातील जनतेकडून भाजपने सूचना व शिफारशी मागितल्या होत्या. यासाठी संकल्प करत भाजपने राज्यभरात पाठवले होते. सर्व सूचना व शिफारशी विचारात घेऊन अशा संकल्पनामा भाजपने तयार केला आहे. राज्यातील विधानसभा मतदानाला केवळ दहा दिवस शिल्लक राहिले असताना भाजपने आता दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवण्याचे ठरवले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक दिवसाचा प्रचार दौरा राज्यात केला होता ते सोमवारी पुन्हा एकदा प्रचार दौऱ्‍यावर राज्यात येणार आहेत. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही गोव्यात येणार आहेत .केंद्रीय गृहमंत्री शहा सात रोजी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 10 व 11 रोजी प्रचार करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 8 व 11 फेब्रुवारी रोजी राज्याच्या प्रचार दौऱ्यावर येणार आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button