ज्येष्ठ राजकारणी प्रचारापासून दूर; दक्षिण गोव्यातील स्थिती

ज्येष्ठ राजकारणी प्रचारापासून दूर; दक्षिण गोव्यातील स्थिती

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीला अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत. दक्षिण गोव्यातील प्रचार शिगेला पोचला आहे. इंडिया आघाडी विरुद्ध भाजप, अशी सरळ लढत दिसत असली तरी आरजीनेही प्रचारावर जोर दिला आहे. या निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीपासून नेहमीच सासष्टी गाजवणारे ज्येष्ठ राजकारणी चार हात लांब आहेत. काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, लुईझिन फालेरो, माजी मंत्री चर्चिल आलेमाव, मिकी पाशेको, आवर्तान फुर्तादो यांच्यासह अन्य काही माजी आमदार आणि मंत्री अद्याप इंडिया आघाडीच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. नेत्यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

कोणतीही निवडणूक असली की, त्यात चर्चिल आलेमाव यांचा सहभाग ठरलेला. मिकी पाशेको, लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन यांची सासष्टीत स्वतःची मते आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मिकी पाशेको आणि आवर्तान फुर्तादो सक्रिय झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत यापैकी एकाही नेत्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे पक्षावर नाराज झालेले सार्दिन सध्या काँग्रेसचे उमेदवार कॅ. वेरिएतो फर्नांडिस यांच्या प्रचारापासून दूर आहेत. आपण प्रचारात सहभागी न झाल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.

माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. पण त्यांच्यावर काँगेसची मते फोडण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सध्या त्यांची भूमिकाही गुलदस्त्यात आहे. बाणावलीत आपचे आमदार वेन्जी व्हिएगस हे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असून आप इंडिया आघाडीचा भाग बनल्यामुळे चर्चिल इंडियाला पाठिंबा देतील, असे वाटत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध असले तरीही त्यांनी भाजपलाही उघड पाठिंबा दिलेला नाही.

अधूनमधून पत्रकार परिषद घेऊन माजीमंत्री मिकी पाशेको आपले अस्तित्व दाखवत असतात. दुहेरी पासपोर्टचा विषय घेऊन ते जनतेसमोर आले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेससोबत होते. मात्र, आलेक्स सिक्वेरा यांना नुवेची उमेदवारी दिल्यामुळे ते पक्षावर नाराज आहेत. नावेलचे माजी आमदार लुईझिन फालेरो यांची नावेलीत स्वतंत्र एकगठ्ठा मते आहेत. तृणमूलच्या खासदारकीसाठी काँग्रेसची आमदारकी सोडलेल्या लुईजिन फालरो यांच्यावर तात्पुरता राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली आहे. गांधी घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी त्यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यापासून ते सक्रिय राजकरणापासून बाजूला झाले आहेत. पर्रिकर सरकारात मंत्री राहिलेले आवर्तान फुर्तादो हे सुध्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून चार हात लांब आहेत.

काहींचा छुपा प्रचार

खात्रीशिर माहितीनुसार यातील काहीनेते भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचा छुपा प्रचार करत आहेत. सासष्टीतील ख्रिश्चन मतदारांचा कल भाजप पेक्षा काँग्रेस, आप किंहा प्रादेशिक पक्षकडे अधिक असल्याचा इतिहास असल्याने ज्येष्ठ नेते जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करीत नसल्याची चर्चा आहे.

माजी मंत्रीही राजकारणापासून दूर

ज्येष्ठ राजकारणी अ‍ॅड. राधाराव ग्रेसियास यांनी जाहीरपणे इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन वेरिएतो फर्नांडिस यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस मधून भाजपात गेल्यानंतर पराभूत झालेले माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज, आमदार बेन्जामिन सिल्वा, गोवा विकास पक्षाचे माजी आमदार कायतू सिल्वा, माजी आमदार क्लाफासियो डायस, राजन नाईक हे अद्यापही कोणत्याही राजकीय प्रवाहात दिसत नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news