जत: पुढारी वृत्तसेवा: सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला देताना काँग्रेसची नेतेमंडळी टाळ घेऊन बसले होते की काय? असा सवाल करून जागा आबाधित न राखता येणाऱ्या काँग्रेसवर आरोप न करता राष्ट्रवादीचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर माजी आमदार विलासराव जगताप यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत. अन्यथा जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते सुरेशराव शिंदे यांनी दिला.
जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, उत्तम चव्हाण, शफीक इनामदार, आप्पासो पवार, शिवाजी शिंदे, बाजी केंगार आदी उपस्थित होते.
सुरेशराव शिंदे म्हणाले की, सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेस आणि शिवसेना यांनी मागितली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जागा मागण्याचा प्रश्नच नव्हता. तसेच यात आमचे नेते जयंत पाटील यांचा कुठलाही संबंध नाही. अपक्ष उमेदवाराचा प्रचार करताना माजी आमदार जगताप यांना टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपच्या अंतर्गत वादामुळे व त्यांना आलेले नैराश्यामुळे जगताप असे वक्तव्य करत आहेत. भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने आता जगतापांना कोणताच पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. ते त्यांनी ताबडतोब थांबवावे, अन्यथा जशास तसे उत्तर येथून पुढील काळात देण्यात येईल.
हेही वाचा