धुळे: पिंपळनेर येथे काकाचा पुतणीवर अत्याचार; चार महिन्यांनंतर गर्भवती असल्याचे उघड | पुढारी

धुळे: पिंपळनेर येथे काकाचा पुतणीवर अत्याचार; चार महिन्यांनंतर गर्भवती असल्याचे उघड

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा:  साक्री तालुक्यातील नागझरी गावातील पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच चुलत काकाच्या अत्याचारानेही पुतणी गरोदर राहिल्याची घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात घडली.या अत्याचारानंतर मुलगी कुटुंबासह गुजरातमध्ये ऊसतोडीसाठी गेल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही.मात्र चार ते पाच महिन्यांनंतर आजीच्या लक्षात हा प्रकार आला;परंतु ऊसतोड मुकादमने न सोडल्यामुळे या मुलीला अखेर बाळास जन्म द्यावा लागला आहे.याप्रकरणी चुलत काकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून,त्याला ताब्यात घेतले.

अल्पवयीन पीडित मुलगी व अत्याचार करणारा संशयित अल्पवयीन मुलगा हे नात्याने चुलत काका पुतणी आहेत. अत्याचार करणारा चुलत काका हा पीडित मुलीच्या घराजवळच राहणारा आहे.ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर त्याच महिन्यात पीडित मुलगी ही गुजरात येथे कुटुंबासोबत ऊसतोडणीच्या कामासाठी निघून गेली.तेथे तीन ते चार महिन्यांनंतर तिचे पोट वाढल्याचे तिच्या आजीच्या लक्षात आले. आजीने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी संबंधित मुकादमला मुलीला घरी पाठवण्याबाबत विनंती केली; परंतु आगाऊ पैसे घेतल्याने त्याने त्यांना घरी पाठवण्यास विरोध केला. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी न झाल्याने तिच्या पोटात गर्भ वाढला. काम संपल्यावर ते घरी आल्यावर तिला पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी ती गरोदर असून,तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला धुळे येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्याठिकाणी ती प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला.

चुलत काकाही अल्पवयीन

संबंधित अत्याचार करणारा चुलत काकाही मोलमजुरी करतो.पीडित मुलीच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात विधिसंघर्षग्रस्त बालक असलेल्या काकाविरुद्ध बलात्कारासह बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधि.2012 चे कलम 4,6, 8,12 (पोक्सो) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button