PM Modi : 'देश मागच्या चुका सुधारत आहे, त्यापासून कोणी रोखू शकत नाही' - पुढारी

PM Modi : 'देश मागच्या चुका सुधारत आहे, त्यापासून कोणी रोखू शकत नाही'

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली : PM Modi :देश मागच्या चुका सुधारत आहे आणि तसे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील पुतळा अनावरण प्रसंगी केले. मोदी यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सध्या या ठिकाणी तात्पुरती होलोग्राम मूर्ती बसविण्यात आली असून नंतर ग्रॅनाईटचा कायमस्वरूपी पुतळा बसविला जाणार आहे.

भारत आपली ओळख तसेच प्रेरणांना पुन्हा पुनर्जीवित करेल. हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल की स्वातंत्र्यानंतर देशाची संस्कृती आणि संस्काराबरोबरच महान व्यक्तींच्या योगदानाला संपवण्याचे काम काही घटकांनी केले, असे सांगत मोदी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.

PM Modi : सुभाषचंद्र बोस यांचा जयंती दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा

केंद्र सरकारने आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा जयंती दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनापासून म्हणजे 23 जानेवारीपासून स्वातंत्र्याचा महोत्सव सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.

पुतळा अनावरण प्रसंगानिमित्त मोदी यांच्या हस्ते वर्ष 2019 ते 2022 या कालावधीतील सुभाषचंद्र बोस नैसर्गिक आपत्ती प्रबंधन पुरस्कार प्रदान करण्यात आले. आजचा दिवसच नव्हे तर कालखंड देखील ऐतिहासिक असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, हे असे स्थान असे आहे की ज्याठिकाणी आपण एक आहोत.

नेताजीनी आपल्याला स्वातंत्र्य तसेच एक भारताचा विश्वास दिला होता. त्यांनी आत्मविश्वास आणि साहसाने ब्रिटिशांकडे मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही तर मी ते प्राप्त करेन , असे ठणकावून सगितले होते. सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आपल्या येणाऱ्या पिढ्याना राष्ट्रीय कर्तव्यांचे भान देत राहतील. त्यांना प्रेरणा देत राहतील.

Back to top button