लोणार सरोवराचे जतन-संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | पुढारी

लोणार सरोवराचे जतन-संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, लोणार, शेगाव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असून लगतच्या जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ अशा पर्यटनस्थळांची जोड देवून एक परिपूर्ण पर्यटन सर्कीट विकसित होऊ शकते. त्यामुळे या सर्व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दिले.
राज्यपालांनी आज (दि. ४) लोणार सरोवर आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्यासह लोणार परिसरातील विकास कामांशी संबंधीत विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, वन कायद्याचे पालन करतानाच पर्यटनाचाही विकास होणे महत्वाचे आहे. लोणार येथे निसर्ग, अध्यात्म तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनातून भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. लोणार सरोवरास दररोज दोन हजाराहून अधिक पर्यटक भेटी देतात. पर्यटकांची स्वच्छतेला पहिली पसंती असल्यामुळे त्यांच्यासाठी पुरेशी स्वच्छतागृहे असावीत यासाठीही प्रयत्न करावेत. लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. या सरोवराचा विकास हा इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने व्हावा. तसेच याठिकाणी वैविध्यपूर्ण दुर्मिळ वनस्पती असून त्यांचे जतन व संवर्धन करण्यात यावे. जिल्ह्यात लोणार, सिंदखेड राजा, शेगांव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे आहेत. तसेच जवळच वेरुळ, अजिंठा सारखी ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. या साऱ्यांच्या एकात्मिक पर्यटन विकासास मोठा वाव असल्याने त्यादृष्टीने व्यापक आणि सर्वसमावेशक प्रयत्न व्हावेत.

जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सुरू आहे. खडकपुर्णा नदीवर हा प्रकल्प होत असून जिल्ह्याच्या सिंचन विकासासाठी हा प्रकल्प पुर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्पात २०२४ पर्यंत ४० टक्के पाणीसाठयाचे नियोजन आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती सादर करण्याच्या सूचना राज्यपालांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. याशिवाय लोणार परिसरातील विविध नागरी सुविधांच्या कामांचा आढावाही राज्यपालांनी घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती,आमदार श्वेता महाले तसेच वन विभाग, महसूल विभाग, पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Back to top button