जपून ! नगरमध्ये रात्री नऊनंतर रस्त्यांवर असते कुत्र्यांचीच दहशत | पुढारी

जपून ! नगरमध्ये रात्री नऊनंतर रस्त्यांवर असते कुत्र्यांचीच दहशत

नगर : पुढारी वृत्तसेवा : मोकाट कुत्री पकडणारी यंत्रणा टेंडर प्रक्रियेत अडकली होती, तर नगर शहरात दिवसेदिवस कुत्र्यांची संख्या चाळीस हजारांपर्यंत पोहोचली. स्थायी समिती, महासभेत आवाज उठवूनही प्रशासन ढिम्म आहे. कोंडवाडा विभागाने मोहीम सुरू केली असली तरी त्याला गती नाही. गणेशोत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी उपनगरांमध्ये नागरिकांना पायी फिरणेही जिकिरीचे झाले आहे.
महापालिकेकडून मोकाट कुत्री पकडण्यासाठी आणि कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी बाह्यसंस्थेला ठेका देण्यात आला होता. परंतु, त्या संस्थेची मुदत संपली. महापालिकेने पुन्हा डेंटर प्रक्रिया केलीच नाही.

संबंधित बातम्या : 

त्यावर स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी व प्रशासन यांच्यामध्ये खडाजंगी झाली. नगसेवक सुनील त्र्यंबके, सभागृहनेता विनीत पाऊलबुधे, नगरसेविका रूपाली वारे, संध्या पवार यांनी तत्काळ कार्यवाहीसाठी महापालिका प्रशासनाला मोकाट कुत्र्यांची प्रतिकृती भेट दिली होती. त्यावर आठ दिवसांत टेंडर प्रक्रिया करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, प्रशासनाची कार्यवाही धीम्या गतीने सुरू असल्याने पुन्हा स्थायी समितीमध्ये कुत्र्यांबाबतच्या प्रश्नांचीच अधिकार्‍यांवर सरबत्ती झाली. त्यात कोंडवाडा विभागप्रमुखांनी आठ दिवसांचा कालावधी मागितला. त्यानंतर महासभेत मोकाट कुत्र्यांचा विषय चर्चेला आला. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. सभागृहात नगरसेवकांनी विचालेल्या प्रश्नांना अधिकार्‍यांना उत्तरे देता आली नाहीत. खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली. मात्र, त्याला प्रशिक्षित कर्मचार्‍यांअभावी गती नसल्याचे बोलले जात आहे. मोहीम सुरू झाली असली तरी कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही.

सावेडी उपनगर, सावेडी गाव, बोल्हेगाव, मुख्य शहर, केडगाव, मुकुंदनगर, सारसनगर भागात कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रात्री दहानंतर कुत्री रस्त्यावर येतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी चालणे अवघड झाले आहे. शहरात आतापर्यंत अनेक वेळा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, तरुण जखमी झाले आहेत.

अ‍ॅनिमल वेस्ट रस्त्यावर
शहरातील काही रस्त्यांवर रात्री अ‍ॅनिमल वेस्ट टाकले जाते. त्यात बोल्हेगाव पूल, तपोवन रोड, मनमाड रोड, औरंगाबाद रोड अशा भागात अ‍ॅनिमल वेस्ट टाकले जाते. परिणामी रात्रीच्या वेळी कुत्री झुंडीने रस्त्यावर फिरताना दिसतात, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

उपनगरामध्ये अद्याप कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही. संबंधित विभागाने मनुष्यबळ वाढवून मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम तीव्र करावी. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करावे.
                                                 – संपत बारस्कर, विरोधी पक्ष नेते

कुत्री पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे. मात्र, त्यात विशेष प्रगती नाही. आजही रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी आढळून येतात.
                                                       – निखील वारे, माजी नगरसेवक

Back to top button