देशातील पहिलाच प्रयोग; नाशिकमध्ये साकारतोय सौरऊर्जेवर चालणारा खतप्रकल्प | पुढारी

देशातील पहिलाच प्रयोग; नाशिकमध्ये साकारतोय सौरऊर्जेवर चालणारा खतप्रकल्प

नाशिक : आसिफ सय्यद

नाशिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालये, रुग्णालये तसेच सुलभ शौचालयांना सौरऊर्जेची झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता विल्होळीस्थित महापालिकेचा खतप्रकल्पही सौरऊर्जेवर चालविला जाणार आहे. खतप्रकल्पावर ३९० किलोवाॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला जात असून, येत्या महिनाभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. सौरऊर्जेवर खतप्रकल्प चालविण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने विल्होळी येथे खतप्रकल्पाची उभारणी केली आहे. घंटागाड्यांद्वारे घरोघरी केरकचऱ्याचे संकलन करून खतप्रकल्पावर कचरा वाहून आणला जातो. या ठिकाणी कचऱ्यापासून कंपोस्ट खताची र्निमिती केली जाते. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताला बाजारात मोठी मागणी आहे. २०१७ पासून महापालिकेने सदर प्रकल्प ‘मेलहेम आयकॉस’ या पुणेस्थित कंपनीला चालविण्यास दिला आहे. या मक्तेदार कंपनीसोबत महापालिकेने ३० वर्षे मुदतीचा करार करत खतप्रकल्पासाठी ‘नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी’ स्थापन करण्यात आली आहे. खतप्रकल्पासाठी सद्यस्थितीत महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेण्यात आला आहे. खतप्रकल्पातील अजस्त्र यंत्रसामग्री चालविण्यासाठी सध्या ३२० किलोवाॅट क्षमतेची वीजजोडणी घेण्यात आली आहे. सदर यंत्रसामग्री चालविण्यासाठी दररोज दोन हजार युनिट इतका वीज वापर होतो. वीज वापरावर दरमहा लाखोंचा खर्च होत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीने खतप्रकल्पावर सौरप्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.

दररोज दीड हजार युनिट वीजनिर्मिती

खतप्रकल्पावर बसविण्यात येत असलेल्या सौरप्रकल्पातून दररोज १,५०० ते १,६०० युनिट वीज निर्माण होणार आहे. खतप्रकल्प हा दिवसरात्र २४ तास चालविला जातो. एकूण २,००० युनिट वीज वापरापैकी दिवसा १,५०० युनिट तर रात्रीच्या वेळी ५०० युनिट वीज वापर होतो. दिवसा होणारा वीज वापरावरील खर्च कमी करण्यासाठी खतप्रकल्प येथील नवीन शेडवर सोलर पॅनल बसविण्यात येत आहेत. सोलर पॅनल बसविता यावेत, यानुसारच नवीन शेडचे बांधकाम करण्यात आले आहे.

महिनाभरात प्रकल्प कार्यान्वित होणार

खतप्रकल्पावर सौर पॅनल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे महावितरणकडील विविध परवानग्यांची प्रक्रियादेखील सुरू आहे. येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर सौरऊर्जेवर हा प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यामुळे या प्रकल्पावर होणारा लाखोंचा वीज खर्च कमी होणार असून, दररोज दीड हजार युनिट विजेची बचतही होणार आहे. नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीमार्फत सौर प्रकल्पाचा खर्च केला जात असून, महापालिकेवर खर्चाचा कुठलाही बोजा असणार नाही.

खतप्रकल्प ठरणार नंबर वन

सौरऊर्जेवर चालणारा नाशिकचा खतप्रकल्प हा देशातील एकमेव प्रकल्प ठरणार आहे. कचऱ्यापासून खतनिर्मितीचा नाशिकचा आदर्श देशभरातील महापालिकांनी घेतला. आता सौरऊर्जेच्या माध्यमातून हा प्रकल्प चालविण्याचा नवा आदर्श खतप्रकल्पाकडून निर्माण केला जात आहे. ऊर्जा बचतीच्या सरकारच्या धोरणांशी सुसंगत असा हा प्रकल्प देशात नंबर वन ठरण्याची शक्यता असून, या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणातील महापालिकेचा गुणानुक्रमही वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

१२ वर्षांत दुप्पट झाला कचरा

‘स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या नाशिककरांनी गेल्या १२ वर्षांतच तब्बल २१ लाख १४ हजार ७६६ मेट्रिक टन कचरा केला आहे. घंटागाड्यांद्वारे घरोघरी संकलन करून हा कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे. या कचऱ्यापासून तब्बल ७४ हजार ४५० मे.टन खताचीनिर्मिती करण्यात आली आहे. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती, प्लास्टिकपासून इंधन आॅइल, सुक्या कचऱ्यापासून इंधन विटा आदी उत्पादनेदेखील खतप्रकल्पावर तयार केली जात आहेत.

दररोज ३५ टन प्लास्टिक कचरा

घंटागाड्याद्वारे केरकचरा संकलित करून खतप्रकल्पावर आणला जातो. सदर कचरा लॅण्डफीलवर टाकला गेल्यानंतर कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. दररोज संकलित होणाऱ्या सुमारे ७०० मे. टन कचऱ्यात तब्बल ३५ टन प्लास्टिक कचरा तर २० टन घरगुती घातक कचऱ्याचा समावेश आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन आॅइल तयार केले जात असून, खतप्रकल्पात मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी बसविण्यात आलेल्या दाहिनीसाठी या इंधनाचा वापर केला जात आहे.

हेही वाचा:

Back to top button