Nagar crime news : तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या | पुढारी

Nagar crime news : तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सात्रळ माळेवाडी हद्दीत पडलेल्या दरोड्याबाबत राहुरी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने तीन दिवसातच आरोपींना मुद्देमालासह पकडले. पोलिसांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील तीन आरोपींना अटक केली असून, सोने खरेदी करणारा पाथर्डी येथील सुवर्णकार फरार झाला आहे. राहुरी पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी सुदर्शन विठ्ठल गिते (32) यांनी तक्रार दाखल केली आहे. दि.15 सप्टेंबरच्या रात्री 1 वाजता दरोडेखोरांनी गिते यांच्या बंगल्याच्या किचनचे दार तोडून घरात प्रवेश केला.

संबंधित बातम्या  :

त्यावेळी घरात गिते यांसह त्यांची पत्नी प्रियंका, मुलगा विवांश व आई असे चार जण झोपले होते. गिते कुटुंबियांना चाकू, कत्तीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, असा एकूण 2 लाख 10 हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दरम्यान, श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचे ठसे मिळविले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर व पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू लोखंडे, कौशल वाघ, हेमंत थोरात, पोलिस हवालदार सोमनाथ जायभाय, पोलिस नाईक कोकाटे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, अरूण मोरे, बाळासाहेब खेडकर, दीपक फुंदे यांनी आरोपींच्या ठशांवरून ओळख पटविली केली.

प्राप्त माहितीनुसार आरोपी बाजीराव चव्हाण (वय 22, रा. आष्टी जि. बीड), तुषार हबाजी भोसले (वय 19, रा. पिंपरखेड ता. आष्टी जि. बीड), रियाज बशीर शेख (वय 49, रा. आष्टी जि. बीड) या तिघांना पाथर्डी हद्दीतून जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरोडेखोरांकडून दागिने खरेदी करणारा पाथर्डी येथील एक सुवर्णकार फरार झाला आहे. त्याच्या तपासासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

हातांच्या ठशांवरून आरोपींचा शोध
गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये आरोपींचे हाताचे ठसे मिळाले होते. ते ठसे चलाखीने सुरक्षित करीत सहायक पोलिस निरीक्षक लोखंडे यांनी अंगुली मुद्रा शाखेकडील प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ठसे डेव्हलप करून प्रकरणातील आरोपींची ओळख पटविली. त्यामुळे आरोपींना गजाआड करण्यात यश आले.

हेही वाचा :

Back to top button