माजी विद्यार्थ्याने १८ हजार चौ. फुट जागा केली शाळेला दान | पुढारी

माजी विद्यार्थ्याने १८ हजार चौ. फुट जागा केली शाळेला दान

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : राज्य शासनाच्या सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. दिलीप भास्करराव बोराळकर यांनी आपण ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या व गावाचे काही तरी देणे लागतो या हेतूने तालुक्यातील बेाराळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी तब्बल 18 हजार चौ. फुट जागा दान दिली आहे. ग्रामीण भागातील मुले शिकावीत यासाठी त्यांची कायम तळमळ राहिली आहे.

याबाबत सविस्‍तर माहिती अशी की, तालुक्यातील बोराळा येथील भुमिपूत्र असलेले डॉ. दिलीप बोराळकर हे राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे माजी सचिव होते. त्यांनी विविध कार्यालयात सेवा बजावली. तसेच भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या विविध विभागामध्येही सेवा बजावली होती. त्यांचे बालपणीचे शिक्षण बोराळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. गावाचे व शाळेचे आपल्यावर संस्कार असल्याने आपण शाळेसाठी काही तरी केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आल्याने त्यांच्या मालकीची गावातील 18 हजार चौ. फुट जागा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला मुले व मुलींच्या शिक्षणासाठी विनामुल्य नोंदणीकृत दान दिली.

दोन दिवसांपुर्वीच त्यांनी जागेची रजिस्ट्री जिल्हा परिषद शाळेच्या नावाने मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली. त्यांच्या या दानशूरपणाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकार्‍यांनी बुधवारी सत्कार केला.

माझे प्राथमिक शिक्षण बोराळा येथे झाले. शाळेतील संस्कारामुळे मी मोठ्या पदावर जावू शकलो. गावच्या शाळेसाठी काही तरी करावे असा विचार माझ्या मनात होता. शाळेला मुबलक जागा असावी या हेतुने मी 18 हजार चौ. फुट जागा शाळेसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. या जागेवर उभारण्यात येणार्‍या शाळेतून हजारो विद्यार्थी घडणार असल्याने मला समाधान आहे.

– डॉ. दिलीप बोराळकर 

– हेही वाचा 

जमिनीवर अतिक्रमण झाल्‍याने लोळण घेत रोकला मुंबई-गोवा महामार्ग

रकुल म्हणते मूड मूड के ना देख

‘तो’ अर्ज सरन्यायाधीशांनी फेटाळला; एजींनी देखील विनंती अर्जावर नोंदवला आक्षेप

Back to top button