चाकण येथे गुटख्याचा मोठा साठा हस्तगत ; 11 लाखांचा माल | पुढारी

चाकण येथे गुटख्याचा मोठा साठा हस्तगत ; 11 लाखांचा माल

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  चाकण येथे विक्रीसाठी आणलेला सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखूसह 11 लाख 54 हजार 601 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून, याबाबत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमध्ये एक स्विफ्ट कार आणि दुचाकीचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने ही कामगिरी केली आहे. गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गिरीश चामले, योगेश आढारी, पोलिस नाईक हृषिकेश भोसुरे, पोलिस जवान समीर काळे, राजकुमार हनमंते, शशिकांत नांगरे हे चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावरील कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते.

या वेळी पोलिस जवान समीर काळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आळंदी फाटा येथे फॅशन सलूनसमोर पाच जण साठवणूक करून ठेवलेला गुटखा तसेच तंबाखू पोत्यात भरून विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून संदीप उमा शंकर व्दिवेदी (वय 27, रा. कडाचीवाडी, ता. खेड), मोहन रामनरेश गुप्ता (वय 21, रा. बलगा वस्ती, मेदनगरवाडी चाकण, ता. खेड), लवकुश कमलेश लाक्षकार (वय 25, रा. आळंदी फाटा, ता. खेड), सुमित विनोदकुमार इटोंदिया (वय 26, रा. कडाचीवाडी, ता. खेड) आणि संतोष उमाशंकर व्दिवेदी (वय 28, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर तपास केला असता कल्लु गुप्ता (रा. चाकण, ता. खेड) याच्या सांगण्यावरून संगनमत करून पोत्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व तंबाखू विक्रीकरिता साठवणूक करून स्वीफ्ट व मोटारसायकलवर भरून विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले. तेथे शासनाने प्रतिबंधित केलेला 2 लाख 94 हजार 610 रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखू आणि स्विफ्ट कार, एक मोटारसायकल असा एकूण 11 लाख 54 हजार 610 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, कल्लु गुप्ता याचा शोध घेत असून, या सर्वांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोज लोहीया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलिस अंमलदार सचिन मोरे, योगेश आढारी, हृषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, शशिकांत नांगरे, समीर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखिल फापाळे, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली.

Back to top button