गणेशमूर्तींचा विश्वविक्रमी प्रयोग फेल; महापालिका प्रशासनासह पदाधिकार्‍यांनाही पडला विसर | पुढारी

गणेशमूर्तींचा विश्वविक्रमी प्रयोग फेल; महापालिका प्रशासनासह पदाधिकार्‍यांनाही पडला विसर

पुणे; हिरा सरवदे : पुणे शहरातील गणेशोत्सव जगभरात पोहोचण्यासाठी महापालिकेने चार वर्षापूर्वी घेतलेला गणेशमूर्तींचा विश्वविक्रमी प्रयोग फेल ठरला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने काढलेल्या त्रुटी महापालिकेला दूर करता आल्या नाहीत, त्यामुळे हा प्रयोग गणेशमूर्तींचा विश्वविक्रमी प्रयोग फसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, दोघांनाही या उपक्रमाचा विसरच पडल्याचे समोर आले.

शहरातील गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापालिकेने 2017 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यासाठी अंदाजपत्रकामध्ये 2 कोटीची तरतूदही करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत शहराचा गणेशोत्सव जगभरात पोहचावा यासाठी एकाच वेळी 3 हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा आणि एकाच वेळी 2 हजार ढोल वादनाचा विश्वविक्रम करण्याचे आयोजिले होते. लाखो रुपये खर्च करून ढोल वादनाच्या उपक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, वादकांची संख्या जमू शकली नाही, त्यामुळे ऐन वेळी वादनाचा उपक्रम रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली.

त्यानंतर पर्यावरण पूरक गणेशमूर्ती साकारण्याचा उपक्रम 24 ऑगस्ट 2017 रोजी सारस बागेत जवळील सणस मैदानावर घेण्यात आला. या उपक्रमात पालिकेच्या 24 शाळांमधील 600 विद्यार्थी आणि खासगी 86 शाळांमधील 2 हजार 482 विद्यार्थी अशा एकूण 3 हजार 82 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत गणेश मूर्ती तयार केल्या. या उपक्रमासाठी पालिकेने 20 ते 25 लाख रुपये खर्च केले.

नोंदणी शुल्कापोटी गिनीज बुककडे 2 लाख रुपये जमा

गणेशमूर्ती विश्वविक्रम या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले, विश्व विक्रमासाठी हवे असणारे चित्रीकरण करण्यात आले, पन्नास विद्यार्थ्यांमागे एक याप्रमाणे स्टोअर्सची नेमणूक करण्यात आली, शिवाय नोंदणी शुल्कापोटी गिनीज बुककडे 2 लाख रुपये जमा करण्यात आले.

यासंदर्भातील सर्व कामे योग्य पद्धतीने होण्यासाठी पालिकेने मिलिंद वेर्लेकर यांची नियुक्ती केली.

हा उपक्रम झाल्यानंतर दोन दिवसात सर्व माहिती गिनीज बुककडे पाठवण्यात येणार असल्याचे सत्ताधार्‍यांकडून सांगितले जात होते. तसेच उपक्रमाच्या ठिकाणी लाऊड स्पिकरमधील वारंवार जाहीर केले जात होते.

मात्र, उपक्रम झाल्यानंतर अनेक महिने नोंदी संबंधीचा प्रस्ताव महापालिकेतच धुळखात पडून होता.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सदर प्रस्ताव गिनीज बुककडे पाठविण्यात आला. प्रस्ताव पाठवल्याचे सांगितल्यानंतर वर्षभराने महापालिकेकडे विचारणा केली असता मिलिंद वेर्लेकर यांच्याकडे बोट दाखवण्यात आले.

त्यानंतर वेर्लेकर यांच्याकडे विचारणा केली असता, गिनीज बुकने उपक्रमा संदर्भात 14 शंका उपस्थित केले आहेत, त्यातील 8 शंकांचे निरसन झाले असून उर्वरित 6 शंकाचे निरसन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

चार वर्षे निरसन होऊ शकले नाही

मात्र, त्यानंतर महापालिका प्रशासन आणि पदाधिकार्‍यांनी या उपक्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने गिनीज बुकने दाखवलेल्या शंकांचे गेली चार वर्षे निरसन होऊ शकले नाही.

आता तर प्रशासनासह पदाधिकार्‍यांनाही लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या या गणेश मूर्ती साकारण्याच्या उपक्रमाचा विसर पडवल्याचे दैनिक पुढारीच्या पाहणीत समोर आले आहे.

उपक्रमाची जबाबदारी पालिकेचे शिक्षण मंडळ, घनकचरा व्यवस्थापन विभाग, कर आकारणी व कर संकलन विभाग यांच्याकडे विभागून देण्यात आली होती. त्यामुळे उपक्रमानंतर कोणत्याच विभागाने या प्रस्तावाचे व विश्वविक्रमाचे नेमके काय झाले, याचा पाठपुरावा करण्याचे कष्ट घेतले नाही.

याबाबत माहिती घेण्यासाठी मिलिंद वेर्लेकर यांच्याशी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला, संदेश पाठवला, मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, हा उपक्रम फेल गेल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

हेही वाचलं का?

अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर

Back to top button