

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा; केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे' कामाचा आढावा घेतला. हरियाणामधील सोहना येथे त्यांनी 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे' कामाची पाहणी केली. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह उपस्थित होते.
एक्सप्रेस वे कामाचा दर्जा हा सर्वोत्कृष्ट रहावा यासाठी प्रयत्न करा. यामध्ये कोणतीही तडजोड दिसून आली तर संबंधितांचे बँड वाजवले जाईल, असा इशाराही नितीन गडकरी यांनी या वेळी दिला.
या वेळी माध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले, दिल्ली-मुंबई महामार्गाचे आरंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर २४ तासांचा प्रवास आता अवघ्या साडेबारा तासांमध्ये पूर्ण होईल. या महामार्गाचे काम मार्च २०२३पर्यंत पूर्ण होईल.
१ हजार ३८० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग ८ पदरी होणार आहे. यामुळे आता दिल्ली आणि मुंबईमधील अंतर १३० किलोमीटरने कमी होईल. भविष्यात हा महामार्ग १२ पदरी केला जावू शकतो. तब्बल ९५ हजार कोटी रुपये खर्च करुन केलेला महामार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग असेल. यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चितौडगढ, उदयपूर, भोपाल, उज्जैन, इंदौर, अहमदाबाद सूरत या शहरांमध्येही जाणे अधिक सुखकर होणार आहे.
या महामार्गावर ठराविक अंतरावर हेलीपॅडची व्यवस्था करण्याची व्यवस्था आहे.
यामुळे आपत्कालिन परिस्थितीमध्ये एयर अल्बुलेंसने हॉस्पिटलला पोहचणे शक्य होणार आहे.
तसेच या महामार्गावर ड्रोनचाही प्रभावी वापर होईल. या महामार्गावरील टोल वसुली अत्याधुनिक सुविधांनी होणार आहे.
पुढील वर्षी मार्च महिन्याप्रयत्न दिल्ली ते दौसा पर्यंतचा प्रवास सुरु होईल.
या महामार्गाची उभारणीवेळी पर्यावरण संवर्धनावरही लक्ष देण्यात आले आहे.
महामार्गावर २० लाख झाडे लावली जातील. या महामार्गामुळे इंधन बचतीबरोबर वायू प्रदूषणही घट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
९ मार्च २०१९मध्ये दिल्ली- मुंबई महामार्गाच्या कामाचा शुभारंभ झाला होता. सध्या या महामार्गावर ८ पदरी काम युद्ध पातळीवर सुरु आहे. १३८० किलोमीटरपैकी १२०० किलोमीटर रस्त्यांचे काम सुरु आहे. आतापर्यंत ३७५ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
हेही वाचलं का?