नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीला अधिक मागणी असते. दरम्यान, भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात चढ उतार सुरुच आहे. बुधवारच्या तुलनेत (Gold Price Today) आज गुरुवारी (दि.१६) सोने प्रति तोळा (प्रति १० ग्रॅम) ४१६ रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीचे दर प्रति किलोमागे ५४९ रुपयांनी कमी झाले.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today (दुपारी १२ वाजेपर्यंतचे अपडेट्स) गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,८३९ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,६५१ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,९०५ रुपये, १८ कॅरेट ३५,१२९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,४०१ रुपये होता.
तर चांदीचा दर प्रति किलो ६३,०८१ रुपयांवरून ६२,५३२ रुपयांवर आला आहे. (हे दुपारपर्यंत अपडेट झालेले दर असून त्यात सायंकाळपर्यंत बदल होऊ शकतो)
दरम्यान एमसीक्सवर (MCX) गोल्ड फ्यूचर्समध्ये ०.०४ टक्क्यांनी घट होऊन सोने प्रति १० ग्रॅम ४६,८७८ रुपयांपर्यंत खाली आले. सोन्याचा एक महिन्यातील हा निच्चांकी स्तर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर प्रति औंस १,८०० डॉलरच्या खाली गेले आहेत. प्रत्यक्षात सोन्याचा दर प्रति औंस १,७९३ डॉलर एवढा आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.
दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.