जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुनिल गावसकर यांचा प्लॉट मी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र.. - पुढारी

जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुनिल गावसकर यांचा प्लॉट मी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र..

मुंबई : पुढारी ऑनलाईन

गृहनिर्माण विभागाने महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्या बाकेसीतील प्लॉटला क्रिकेटसह अन्य खेळांचेही प्रशिक्षण तसेच अन्य सुविधा उभारण्यास परवानगी दिली आहे. मात्र खात्याचे मंत्र जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आपण मंत्री म्हणून प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता असे सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी ‘जर सुनिल गावसकर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावसकर फिलिप्स डीफ्रायटेसच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला होता. त्या दिवसापासून जवळ – जवळ माझा क्रिकेटमधला इंटरेस्टच संपला. स्टेडियममधून रडत बाहेर पडलो होतो.’ असे पहिले ट्विट केले.

त्यानंतर त्यांनी ‘गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावसकरसाठी बदलला. आता तरी सनिल गावसकरने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी एवढीच इच्छा.’ असे दुसरे ट्विट केले.

तत्पूर्वी, या प्लॉटवर क्रिकेटसह अन्य खेळांचेही प्रशिक्षण तसेच अन्य सुविधा उभारण्यास परवानगी मिळावी, ही गावसकर यांची विनंती गृहनिर्माण विभागाने मान्य केली. त्यामुळे इनडोअर क्रिकेट स्टेडियमऐवजी या स्टेडियमला बहुद्देशीय क्रीडा केंद्र असे संबोधण्यात येईल.

या केंद्राच्या उभारणीसाठी ३० दिवसांच्या आत म्हाडा सोबत करारनामा करावयाचा आहे. करारनामा झाल्यानंतर एक वर्षाच्या आत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करून तीन वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

अटी, शर्तींसह दोन हजार चौरस फूट जागा दिली

काही अटी व शर्तींच्या अधिन राहून म्हाडाने गावसकर यांना बीकेसीत दोन हजार चौरस फूट जागा दिली. या जागेवर क्रिकेटसह अन्य खेळांच्या प्रशिक्षणालाही परवानगी मिळावी, अशी विनंती गावसकर यांनी म्हाडाला केली होती. त्यासाठी गृहनिर्माण खात्याची परवानगी आवश्यक होती.

या ठिकाणी हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम, तरण तलाव, स्क्वॅश तसेच प्रशिक्षणार्थीची राहण्याची व्यवस्था आणि स्पोर्ट्स कॅफे सुरु करण्याची परवानगी मागण्यात आली होती. शिवाय क्रिकेटसह बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांसाठीही परवागी मागितली होती.

प्रशिक्षणार्थीना, खेळाडूंना काही दुखापत झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय केंद्रही उभारण्याची मागणी केली होती. या मागण्या गृहनिर्माण विभागाने मान्य केल्या आहेत.

इतर खेळांसोबत क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याची हमी गावसकर यांच्याकडून घेतली जाणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये खेळाडूंसाठी तज्ञ खेळाडू व प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

प्रशिक्षण केंद्रातून मिळणाऱ्या नफ्यातील २५ टक्के रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार आहे. सुनिल गावसकर फाउंडेशन या केंद्राची उभारणी करणार आहे.

Back to top button