IND vs PAK T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामना पावसात वाहून गेला तर काय होणार? जाणून घ्या… | पुढारी

IND vs PAK T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामना पावसात वाहून गेला तर काय होणार? जाणून घ्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन भूमीवर टी 20 विश्वचषक स्पर्धेचा थरार 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. दोन्ही संघांमधील हा हाय व्होलटेज सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळवला जाईल.

पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता…

विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. पण 23 ऑक्टोबरला मेलबर्नमधील पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मेलबर्नमध्ये 20 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग होऊ शकतो. हवामान अंदाजानुसार, 23 ऑक्टोबर रोजी पावसाची 60 टक्के शक्यता आहे. त्याचवेळी किमान तापमान 12 अंशांवर तर कमाल तापमान 19 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सामना पावसाने वाहून गेला तर काय होईल?

भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी दोनवेळा आमने-सामने आले होते. दोघांनीही एक-एक सामना जिंकला. साखळी सामन्यात भारताने तर सुपर फोर फेरीत पाकिस्तानने विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातील टी 20 स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. याकडे सा-या जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण हवामान विभागाने या दिवशी मेलबर्न येथे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अशातच पावसामुळे सामना खेळला गेला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. सुपर 12 फेरीतील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. मात्र, जर सामना पावसामुळे वाहून गेला तर ही बाब दोन्ही संघांसह चाहत्यांनाही आवडणार नाही.

यासंदर्भात आयसीसीने यापूर्वीच सूचना जारी केल्या आहेत. सुपर-12 फेरीत, प्रत्येक संघाला विजयासाठी दोन गुण, तर पराभूत संघाला शून्य गुण मिळतील. सामना बरोबरीत किंवा रद्द झाल्यास संघांमध्ये एक गुण विभागून दिला जाईल. गटातील दोन संघांचे गुण समान असल्यास, त्यांनी स्पर्धेत किती सामने जिंकले, तसेच त्यांची निव्वळ धावसंख्या किती होती आणि आमने-सामनेचा विक्रम काय आहे, या आधारे क्रम ठरवला जाईल.

टीम इंडियाला घ्यायचा आहे बदला… (IND vs PAK T20 World Cup)

खराब राजकीय आणि राजनैतिक संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका गेल्या अनेक वर्षांपासून खेळली जात नाही. अशा परिस्थितीत, दोन्ही देश केवळ आयसीसी विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते चातकाप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे नजर लावून असतात.

गेल्या वर्षी टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा हा पहिलाच पराभव ठरला. आता भारतीय संघाला टी-20 विश्वचषक आणि नुकत्याच झालेल्या आशिया कपमधील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान रेकॉर्ड (IND vs PAK T20 World Cup)

2007 – साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला (बॉल आऊट) (द. आफ्रिका)
2007 – फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला. (द. आफ्रिका)
2012 – भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला (कोलंबो)
2014 – भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला (ढाका)
2016- भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला (कोलकाता)
2021- पाकिस्तानने भारतावर 10 विकेट्सने मात केली (दुबई)

सुपर-12 फेरीत भारताला एकूण पाच सामने खेळायचे आहेत

टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सुपर 12 फेरीत एकूण 5 सामने खेळायचे आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्या संघाशी टीम इंडियाचा सामना होईल. त्यानंतर 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका आणि 2 नोव्हेंबरला बांगलादेशशी टीम इंडिया भिडणार आहे. तर टीम इंडियाचा सुपर-12 टप्प्यातील शेवटचा सामना 6 नोव्हेंबर रोजी गट-ब मधील विजेत्या संघाविरुद्ध होणार आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे सामने (भारतीय वेळेनुसार)

भारत विरुद्ध पाकिस्तान : 23 ऑक्टोबर : दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न
भारत विरुद्ध विरुद्ध गट अ उपविजेता : 27 ऑक्टोबर : दुपारी 12.30 वाजता, सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर : संध्याकाळी 4.30, पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश : 2 नोव्हेंबर : दुपारी 1.30 वाजता, अॅडलेड
भारत विरुद्ध गट ब विजेता : 6 नोव्हेंबर : दुपारी 1.30 वाजता, मेलबर्न

Back to top button