राजकारण : विदर्भात भाजपला धक्का, तोडसाम ‘राष्ट्रवादी’त जाणार | पुढारी

राजकारण : विदर्भात भाजपला धक्का, तोडसाम ‘राष्ट्रवादी’त जाणार

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील राजकारण तापले आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी केळापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजत आहे.

अधिक वाचा :

राजू तोडसाम यांच्या मागे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे भक्कम मताधिक्य असल्यामुळे भाजपला विदर्भात दुसरा धक्का सहन करावा लागणार आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही भाजपला खिंडार पडणार असल्याची जोरदार चर्चा विदर्भात होत आहे.

तोडसाम आमदार असताना, आर्णी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपला आर्णी केळापूर विधानसभेत भरभरून मतदान झाले होते.

मात्र येथे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी निवडणूक जिंकली होती; तेच विद्यमान खासदार आहेत.

अधिक वाचा :

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन आमदार तोडसाम यांना तिकीट दिले नाही. परिणामी तोडसाम नाराज झाले. तरीही अपक्ष विधानसभा लढवून मोठ्या संख्येत गठ्ठा मतदान त्यांनी मिळवले.

निवडणुकानंतर भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली होती. ही बाब तोडसाम यांना सलत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे भाजपला रामराम ठोकून आदिवासी नेते तोडसाम आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याचे बोलले जात आहे.

राजू तोडसाम यांनी ‘पुढारी’शी दूरध्वनीवरून बोलताना राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबतच्या वृत्तास दुजोरा दिला. येत्या ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हातावर घड्याळ बांधणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

अधिक वाचा :

Back to top button