गोल्डन मॅन च्या मुलाला चापट मारल्याने ‘त्या’ तरुणाचा खून | पुढारी

गोल्डन मॅन च्या मुलाला चापट मारल्याने 'त्या' तरुणाचा खून

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : दारू पिताना गोल्डन मॅन च्या मुलाला चापट मारल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून तरुणाचा खून केल्याचे उघड झाले आहे. ही घटना सोमवारी (दि. २६) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली. पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले आहे.

शुभम दत्ता फुगे (२६, रा. भोसरी), प्रथमेश वायकर (वय १९), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमन सुरेश डांगळे (वय २७, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय २५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन डांगळे यांचा धारदार शस्त्राने वार करून अज्ञातांनी खून केला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना मयत अमन हा दिवंगत गोल्डन मॅन दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम याचा मित्र आहे. तसेच, तो पळून जाण्याचा तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, भोसरी पोलिसांनी दोन पथके तयार करून शुभम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुली पोलिसांजवळ दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वायकर आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

आरोपी शुभम याच्या विरोधात यापूर्वी तीन तर विधीसंघर्षीत बालकाच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

टेरेसवरील पार्टीत वादाची ठिणगी

आरोपी आणि मयत अमन डांगळे हे शुभम फुगे याच्या घराच्या टेरेसवर एकत्र दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून अमन डांगळे यांनी शुभम फुगे याला चापट मारली.

त्यानंतर ‘आमच्या भाईला का मारले, असे म्हणून आरोपींनी डांगळे यांना भोसरी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ नेले. तेथे आरोपींनी आपसात संगनमत करूम त्यांचा खून केला.

Back to top button