बीड : जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी रोखला | पुढारी

बीड : जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी रोखला

केज; पुढारी वृत्तसेवा : कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा टेम्पो केज – अंबाजोगाई रस्त्यावरील पिसेगाव फाटा येथे पोलिसांनी आज (दि.३०) पकडला. ही कारवाई केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने आज पहाटे ५.३० च्या सुमारास केली. यावेळी १२ बैल व टेम्पो असा एकूण ९ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना एक टेम्पो (एम. एच. ०४ ईएन ८७३५) जनावरे घेऊन केजमार्गे अंबाजोगाई रस्त्याने कत्तलखान्याकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशावरून पोलीस नाईक दिलीप गित्ते, विकास चोपणे, अनिल मंदे, रामहरी भंडाने, चालक दराडे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे केज-अंबाजोगाई रस्त्यावरील पिसेगाव फाटा येथे सापळा लावून हा टेम्पो पकडला. टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत क्षमतेपेक्षा जास्त १२ बैल हे क्रूरतेने व निर्दयपणे भरण्यात आल्याचे दिसून आले.

चालक जाकेर खाजाभाई खुरेशी (रा. विडा) याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दिलीप आश्रुबा घोरपडे व अप्पाराव घोरपडे (दोघे रा. विडा) यांच्या मालकीचे हे बैल असल्याची माहिती त्याने दिली. मात्र त्याच्याकडे कागदपत्रे आढळून न आल्याने हे बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी १२ बैलांसह टेम्पो असा ९ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून जाकेर खुरेशी, दिलीप घोरपडे, अप्पाराव घोरपडे या तिघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार दत्तात्रय बिक्कड हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button