मिझोराम-आसाम सीमासंघर्ष पुन्‍हा उफाळला, हिंसाचारात ६ पोलिसांचा मृत्‍यू | पुढारी

मिझोराम-आसाम सीमासंघर्ष पुन्‍हा उफाळला, हिंसाचारात ६ पोलिसांचा मृत्‍यू

गुवाहाटी ; पुढारी ऑनलाईन: मिझोराम-आसाम सीमा संघर्ष पुन्‍हा एकदा उफाळला आहे. येथे झालेल्‍या हिंसाचारात आसाम पोलिस दलातील सहा कर्मचार्‍यांचा मृत्‍यू झाला.या हिंसाचारामुळे मिझोराम-आसाम राज्‍यांमधील तणाव मंगळवारीही (दि. २६) तणाव कायम राहिला. या संघर्षात ५० हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.

अधिक वाचा 

मिझोराम-आसाम सीमासंघर्ष

आसाममधील बराक खोर्‍यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी या जिल्‍ह्यांची मिझोरामधील ऐझॉल, कोलसिब आणि मामित या तीन जिल्‍ह्यांवह लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. यावरुन दोन राज्‍यांमध्‍ये संघर्ष आहे.

सोमवारी आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एक पोलिस चौकी ताब्‍यात घेण्‍याचा प्रयत्‍न केला. या वेळी दोन्‍ही पोलिस दलांमध्‍येच धुमश्‍चक्री झाली. गोळीबारात आसाम पोलिस दलातील पाच कर्मचार्‍यांचा मृत्‍यू झाला. तर ५० हून अधिक कर्मचारी जखमी झाले.

अधिक वाचा 

पोलिस अधीक्षक वैभन निंबाळकर जखमी

हिंसाचारात कछर जिल्‍ह्याचे पोलिस अधीक्षक वैभव चंद्रकांत निंबाळकर हे जखमी झाले आहेत. त्‍यांच्‍या पायाला गोळी लागली आहे. वैभव निंबाळकर हे मुळचे बारामती येथील आहेत. ते आसाम केडरचे अधिकारी आहेत.

दोन्‍ही राज्‍यांच्‍या मुख्यमंत्र्यांचे आरोप-प्रत्‍यारोप

‘मिझोराम पोलिसांनी थेट लाईट मशीनगनेच आसाम पोलिसांवर केलेल्‍या गोळीबाराची घटना दुर्दैवी आहे. आसाम पोलिस दलातील सहा पोलिसांनी आपल्‍या कायदेशीर सीमेचे रक्षण करण्‍यासाठी प्राणाहुती दिली आहे. त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या दु:खात मी सहभागी आहे’, असे ट्‍विट आसामचे मुख्‍यमंत्री हेमंत बिस्‍वा सरमा यांनी केले.

आसाम पोलिसांनी सीमा भागातील पोलिस चौकीचा ताबा घेण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी त्‍यांनी मिझोराम पोलिसांच्‍या वाहने पेटवली. त्‍यामुळेच मिझोराम पोलिसांनी गोळीबार केला, असा दावा मिझोरामचे मुख्‍यमंत्री झोरामथंगा यांनी केला आहे.

अधिक वाचा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली चर्चा

हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्‍यमंत्री हेमंत बिस्‍वा सरमा आणि मिझोरामचे मुख्‍यमंत्री झोरामथंगा यांच्‍याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्‍ही राज्‍यांमध्‍ये शांतता राखावी, अशी सूचना शहा यांनी केली. संबंधित पोलिस चौकीचा ताबा हा केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) सोपविण्‍यात आला आहे.

नेमका काय आहे वाद ?

आसाममधील बराक खोर्‍यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी या जिल्‍ह्यांची सीमा ही मिझोरामधील ऐझॉल, कोलसिब आणि मामित या तीन जिल्‍ह्यांस लागून आहे. हा प्रदेश एकुण १६४ किलोमीटरचा आहे.

ब्रिटीशांनी ऑगस्‍ट १८७५मध्‍ये कछर जिल्‍ह्याची सीमा निश्‍चित करण्‍यात आली. यामध्‍ये मिझोराममधील लुशी खोर्‍याचाही समावेश होता. आसाम गॅझेटमध्‍ये या सीमा निश्‍चितीचा उल्‍लेख आहे.

१९३३मध्‍ये पुन्‍हा एकदा लुशी खोरे आणि कछर जिल्‍ह्यातील सीमा या १८७५नुसारच निश्‍चित करण्‍यात आल्‍या.

देश स्‍वतंत्र झाल्‍यानंतर आसामला १९६३ मध्‍ये तर मिझोरामला १९७२मध्‍ये राज्‍याचा दर्जा मिळाला.

मिझोरामला राज्‍याचा दर्जा मिळाल्‍यानंतर आसाम आणि मिझोरामधील वादग्रस्‍त सीमाभागात दोन्‍ही राज्‍यांनी प्रवेश बंदी करावी, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले हाेते.

मात्र फेब्रुवारी २०१८ मध्‍ये  मिझोराममधील विदयार्थी संघटना ‘एमझेडपी’ने या भागात शेतकर्‍यांना विश्रांतीसाठी एक लाकडी विश्रामगृह उभारले.

ते आसाम पोलिसांनी तोडून टाकले.

यानंतर ऑक्‍टोबर २०२०मध्‍ये आसाममधील लैलापूर येथील जमिनीवर मिझोरामने बांधकामाचा प्रयत्‍न केला होता. यावेळी दोन्‍ही राज्‍यांमध्‍ये तणाव निर्माण झाला होता.

आता पुन्‍हा एकदा  सीमावादाचा संघर्षातून आसाममधील सहा पोलिस कर्मचारी ठार झाल्‍याने दोन्‍ही राज्‍यांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ : बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…

Back to top button