संत भूमीच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनवणे आवश्यक : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

संत भूमीच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनवणे आवश्यक : खा. सुप्रिया सुळे

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा : मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. या संतांच्या आशीर्वादासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आले असून या भूमीत आल्यावर मला खूपच आनंद झाला आहे. या शहराचा विकास करण्यासाठी, नागरिकांच्या मनातील मास्टर प्लॅन उभा करण्यासाठी आपणाला प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवेढा दौऱ्यावेळी केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मंगळवेढा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्या बोलत होत्या. संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत नागरिकांना अपेक्षित असणारे स्मारक उभे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय समतेची शिकवण देणारे जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत विचारले असता त्यांनी नागरिकांच्या मनातील वास्तू उभा करण्यासाठी चांगल्या मास्टर प्लॅनची गरज असून तो मास्टर प्लॅन निर्माण करण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील असे यावेळी त्यांनी सांगितले.

मंगळवेढा ही फार ऐतिहासिक भूमी असून मंगळवेढ्याला सांस्कृतिक वारसा मोठा आहे. राज्याला सुसंस्कृत बनवण्यामध्ये थोर संतांचे विचार कारणीभूत असतात. त्यामुळे इतिहासाची जपणूक करणे हे आपली जबाबदारी आहे. तसेच पंढरपूर- विजयपूर रेल्वे मार्ग अद्याप दृष्टिक्षेपात आला नसल्याचे विचारले असता याबाबत त्यांनी संसदेमध्ये प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. संत कान्होपात्राचे कार्य महान असून त्यांचे दुर्लक्षित झालेले स्मारक हे चांगल्या पद्धतीने निर्माण करणे, हे नव्या पिढीने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुळे यांनी माजी नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

दरम्यान, मंगळवेढा येथे आले असता रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या वाड्याला त्यांनी भेट दिली. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्यातून काढता पाय घेत पंढरपूरच्या दिशेने त्या रवाना होणार आहेत असे सांगत दौरा संपल्याचे जाहिर केले. यानंतर त्या चोखामेळा चौकातून दामाजी चौकाकडे त्या मार्गस्थ झाल्या.

हेही वाचलंत का? 

Back to top button